सर्व समाजाने एकत्रीत येवून श्रीरामांच्या मंदिर उभारणीत नोंदवावा सहभाग
महामंडलेश्वर जनार्दन महाराज : यावलमध्ये निधी संकलन कार्यालयाचा शुभारंभ
यावल : जात, पात, पंथ मिळून सर्व समाजाने एकत्रीत येऊन श्रीरामांचे भव्य असे राममंदिर उभारणीच्या राष्ट्रकार्यात आपला सहभाग नोंदविण्याची संधी असल्याचे प्रतिपादन फैजपूर येथील महामंडलेश्वर परमपूज्य जनार्दन महाराज यांनी केले. शहरात श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र निर्माण निधी संकलन कार्यालयाच्या शुभारंभप्रसंगी ते प्रसंगी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निधी संकलन तालुका समितीचे सदस्य मधुकर शिर्के होते.
व्यासपीठावर यांची उपस्थिती
व्यासपीठावर भक्ती किशोरदासजी महाराज, ह.भ.प धनराज महाराज, मधुकर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष शरद महाजन, नगरसेवक डॉ.कुंदन फेगडे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे धोंडू अण्णा माळी होते. कार्यक्रमाचे सुरवातीस उपस्थित मान्यवर व शहरातील नागरीकांची कोहळेश्वर राममंदिरातून शहराच्या मुख्य रस्त्यावरुन रॅली काढण्यात आली. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रभू श्रीरामचंद्र व भारतमाता यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून दीपप्रज्वलन करून कार्यक्रमास सुरवात झाली. प्रास्ताविक समिती तालुकाप्रमुख राजेश्वर बारी यांनी केले. महामंडलेश्वर परमपूज्य जनार्दन महाराज, भक्ती किशोरदासजी महाराज व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते निधी संकलन कार्यालयाचे फीत कापून उद्घााटन झाले. अयोध्येत प्रभू श्रीराम चंद्र यांचे मंदिर निर्माण कार्यासाठी निधी संकलन हे केवळ निमित्त आहे. या अभियानात प्रत्येकाचा खारीचा वाटा असणे गरजेचे आहे. मंदिर उभारणीसाठी निधी संकलनापेक्षा या निमित्ताने प्रत्येक माणूस जोडला जाणे महत्वाचे आहे. माणसे जोडण्याचा हा प्रयत्न आहे. माणसे जोडली की देशाची प्रगती होत असते, असे विचार भक्ती किशोरदास यांनी व्यक्त केले. यावेळी नगरसेवक डॉ.कुंदन फेगडे यांनी एक लाख एक हजाराची देणगीचा धनादेश दिल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला. सूत्रसंचालन हर्षल मोरे यांनी तर अनिकेत सोरटे याने आभार मानले.



