गरीब बेघर वस्तीतून राम मंदिर निधी संकलनास फैजपूर शहरात सुरुवात


फैजपूर : अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या निधी संकलन अभियानास फैजपूर शहरात नुकतीच सुरुवात करण्यात आली. निधी संकलन समितीचे जिल्हाध्यक्ष महामंडलेश्‍वर जनार्दनहरीजी महाराज तसेच निधी संकलन समितीचे कार्यकर्ते, पदाधिकारी, रामभक्त नागरीक यांच्या उपस्थितीत फैजपूर शहरातील आंबेडकर नगर, रामदेव बाबा नगर, कोळीवाडा, भिलवाडी, रोहिदास नगर या बेघर वस्तीत तसेच दीनदुबळ्या, गरीब, निराधार असलेल्या भागात श्रीरामाच्या मंदिर निर्माणासाठी निधी संकलनाची सुरुवात करण्यात आली. समाजाच्या शेवटच्या घटकाचा मंदिर निर्माणासाठी एक रुपया सुद्धा यावेळी महत्त्वाचा आहे, असे महामंडलेश्‍वर जनार्दन हरीजी महाराज यांनी सांगितले. या वस्तीत शेकडो हातावर पोट भरणारे मजूर, सफाई कामगार, वीटभट्टी कामगार, केळी वाहतूक महिला, लोहार कुटुंब या राम भक्तांनी आपल्या यथाशक्ति शंभर रुपयापासून ते हजार रुपयापर्यंत देणगी देऊन आनंद व्यक्त केला.

सफाई कामगारांकडून 21 हजारांचा निधी
वाल्मिक समाजाचे नगरपालिकेत असलेले सफाई कामगारांनी 21 हजार रुपयाचा निधी मंदिर निर्माणासाठी देणगी म्हणून यावेळी जाहीर केला. गरीब दिनदुबळ्या मजूर वर्गाच्या झोपडीत महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांचे पाय लागले हाच आनंद त्यांच्या चेहर्‍यावर दिसून येत होता. या आनंदाच्या भरात घरात जवळ असलेले पैसे प्रत्येक जण आणून देऊन आमचा हा खारीचा वाटा स्वीकारावा, अशी विनंती करत होता. हे दृश्य पाहून, ऐकून अनेकांचे डोळे पाणावले. एक सुंदर अशी सुरुवात श्री राम लल्ला यांच्या मंदिर निर्माणासाठी फैजपूर शहरातून करण्यात आली. 15 फेब्रुवारीपर्यंत हे निधी संकलन अभियान राबविण्यात येणार आहे. यासाठी लोकेश कोल्हे (फैजपूर नगर अभियान प्रमुख), युवराज किरंगे (निधी प्रमुख), दीपक पाटील (सह अभियानप्रमुख), हर्षल महाजन (सह निधी प्रमुख), रीतेश चौधरी, नीरज झोपे, संजय सराफ, विनोद कोल्हे, मोहित पाठक, सूरज गाजरे, चेतन पाटील आदि रामसेना परीश्रम घेत आहे.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !