भुसावळातील गोळीबार प्रकरणी आरोपीची जामिनावर सुटका
भुसावळ : लॉण्ड्रीचा पत्ता न सांगितल्यानंतर तक्रारदार आदित्य संजय लोखंडे (19, न्यू आंबेडकर नगर, भुसावळ) यांच्या कानाजवळ गोळीबार करण्यात आल्याची घटन 9 जुलै 2020 रोजी रेल्वे रुग्णालयाजवळील कब्रस्थानजवळ घडली होती. या घटनेनंतर संशयीतांनी आयफोन कंपनीचा मोबाईल व आपाची कंपनीची दुचाकी लांबवल्याने शहर पोलिसात संशयीत आरोपी आतीष खरात, हंसराज, गोलू उर्फ राजन खरात, चिन्ना, सुरज, गोविंदा, कपिल कासे (सर्व रा.भुसावळ, पूर्ण नाव माहित नाही) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील संशयीत गोलू उर्फ राजन खरात यास 21 डिसेंबर रोजी अटक करण्यात आली होती. आरोपीने सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केल्यानंतर न्या.एस.पी.डोलारे यांनी 25 हजारांच्या जात मुचलक्यावर 12 रोजी जामीन मंजूर केला. सरकारतर्फे अॅड.एस.डी.सोनवणे तर संशयीत आरोपीतर्फे अॅड.सत्यनारायण पाल यांनी काम पाहिले.


