भुसावळात चाकूच्या धाकावर हॉटेल चालकास लूटले
महामार्गावरील पंजाब खालसा ढाब्यावरील घटना : दाखल गुन्हा मागे घेण्यासाठी दबाव
भुसावळ : पोलिस ठाण्यात दाखल असलेला गुन्हा मागे घ्यावा यासाठी चाकूच्या धाकावर धमकी देत टोळक्याने महामार्गावरील पंजाब खालसा हॉटेलमध्ये सामानाची फेकाफेक करीत सात हजारांची रोकड लांबवली तसेच हॉटेल चालक सारंगधर महादेव पाटील (खडका रोड, भुसावळ) यांना जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याची घटना सोमवारी रात्री 10.30 वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी हॉटेल मालकाने दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपी आशिक बेग अस्लम बेग मिर्झा उर्फ बाबा काल्या, समीर (पूर्ण नाव नाही, रा.खडका रोड, भुसावळ), नईम (पूर्ण नाव नाही) व अन्य तीन अनोळखींविरुद्ध बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपींच्या शोधार्थ डीबीचे पथक रवाना करण्यात आले आहे. या घटनेने शहरात मोठी खळबळ उडाली असून वाढती गुन्हेगारी पुन्हा ऐरणीवर आली आहे.


