निमखेडीत राष्ट्रपुरूषांचा पुतळा हटवल्यानंतर पोलिसांवर दगडफेक : दोन कर्मचारी जखमी
जिल्हा पोलिस अधीक्षकांसह अधिकार्यांची धाव : सात ते आठ संशयीत ताब्यात
मुक्ताईनगर : तालुक्यातील निमखेडी खुर्द येथे राष्ट्रपुरूषांचा विनापरवानगी पुतळा मध्यरात्री बसवण्यात आल्यानंतर मंगळवारी सकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी गावात धाव घेतली असता अचानक जमावाने पोलिसांच्या दिशेने तुफान दगडफेक केल्याची घटना दुपारी 12 वाजेच्या सुमारास घडली. या घटनेत पोलिस कर्मचारी कचरे व मोहसीन शेख हे जखमी झाल्याने त्यांना तातडीने जळगाव येथे उपचारार्थ हलवण्यात आले.
जिल्हा पोलिस अधीक्षकांची धाव
या घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे, अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी, पोलिस उपअधीक्षक नरेंद्र पिंगळे, पोलिस निरीक्षक सुरेश शिंदे, प्रांताधिकारी, तहसीलदार, ग्रामसेविका आदींचा ताफा गावात दाखल झाल्यानंतर ग्रामस्थांना शांततेचे आवाहन करण्यात आली. पोलिसांनी विधीवत पूजा केल्यानंतर पुतळा ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू करताच काही वेळ तणाव पसरला मात्र पोलिसांनी परीस्थिती नियंत्रणात आणली. या प्रकरणी मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून सात ते आठ संशयीतांना ताब्यात घेण्यात आल्याचे समजते. अधिक तपास पोलिस निरीक्षक सुरेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.



