पोलिस तरुणीचा विनयभंग : तरुणासह सात जणांविरुद्ध गुन्हा
यावल : तालुक्यातील चुंचाळे गावातील रहिवासी व संगमेश्वर, जि.रत्नागिरी येथे पोलिस शिपाई असलेल्या 28 वर्षीय तरुणीचा संशयीत आरोपी शरद अशोक पाटील (चुंचाळे) याने फिर्यादी तरुणीशी 2014 ते 18 जानेवारी 2021 दरम्यान मैत्रीपूर्व संबंधातून तरुणीस शिवीगाळ, दमदाटी करीत धमकी देत विनयभंग करीत पैशांची मागणी केल्याप्रकरणी यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. फिर्यादी तरुणी गावी आली असता संशयीत आरोपी शरद अशोक पाटील याच्यासह अन्य पाच ते सात जणांनी तरुणी शेतात आपल्या आईचा जेवणाचा डबा घेवून जात असताना तरुणीला वाईट वाटून सार्वजनिक ठिकाणी जातीवाचक शिवीगाळ करून मनाला लज्जा वाटेल, असे कृत्य केल्याचा आरोप आहे. तरुणीच्या फिर्यादीवरून संशयीत आरोपी शरद अशोक पाटील, कल्पना अशोक पाटील, आशा शरद पाटील, बायजाबाई पाटील (पूर्ण नाव माहीत नाही), जनाबाई पाटील, पूनम स्वप्नील पाटील, स्वप्नील पाटील (सर्व रा.चुंचाळे, ता.यावल) यांच्याविरुद्ध फिर्याद दिल्याने विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास विभागीय पोलिस अधिकारी नरेंद्र पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सुधीर पाटील, पोलिस उपनिरीक्षक जितेंद्र खैरनार हे करीत आहेत.


