भूमीहीन लाभार्थींना तत्काळ जागा द्याव्यात : गटविकास अधिकारी दीपाली कोतवाल
रावेर : महाआवास योजनेची घरकुलासंदर्भात महत्वाची आढावा बैठक व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे पंचायत समितीत गट विकास अधिकारी दीपाली कोतवाल यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. रावेर तालुक्यात अपूर्ण घरकुले पूर्ण करण्यासंदर्भात या बैठकीत सूचना करण्यात आल्या. तालुक्यात सध्या प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत 365 घरकुले अपूर्ण असून दोन हजार 146 घरकुले पूर्ण असून रमाई आवास योजनेची 187 घरकुले अपूर्ण असून 864 घरकुले पूर्ण आहे. शबरी आवास योजनेची 147 घरकुले अपूर्ण असून 242 घरकुले पूर्ण आहे. बैठकीला धीरज धनगर, विनय पाटील, प्रतीक पाटील, शशिकांत सपकाळे, राहुल गाढे, वसीम तडवी, आकाश चौधरी आदी उपस्थित होते.
या विषयावर झाली चर्चा
यावेळी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे झालेल्या बैठकीत भूमीहीन लाभार्थींना जागा उपलब्ध करून देणे, घरकुलांच्या उद्दिष्टांप्रमाणे शंभर टक्के मंजूरी देणे, मंजूर घरकुलांना पहिल्या हप्त्याचे शंभर टक्के वितरण करणे, घरकुलांच्या उद्दिष्टांप्रमाणे शंभर टक्के घरकुले भौतीकदृष्टया पूर्ण करणे, प्रलंबित घरकुले पुर्ण करणे, सर्व घरकुले आर्थिकदृष्टया पूर्ण करणे, गवंडी प्रशिक्षण पूर्ण करणे, डेमो हाऊसेस उभारणे, कायम स्वरुपी प्रतीक्षा यादीतील लाभार्थींचे आधार सिडींग व आवास प्लसमधील लाभार्थींचे आधार सिडींग/जॉब कार्ड मॅपींग शंभर टक्के पूर्ण करणे, शासकीय योजनांशी कृतिसंगम व नाविण्यपुर्ण उपक्रम राबविणे आदी विषयावर चर्चा करण्यात आली.



