नगरविकास मंत्र्यांना मुक्ताईनगरातील मुस्लिम समाजबांधवांचे निवेदन
गट नं.373/1 मधील जमीन मुस्लिम कब्रस्तानकरीता जागा आरक्षित करण्याची मागणी
मुक्ताईनगर : शहरातील गट नं.373/1 मध्ये प्रस्तावित बिनशेती (एन.ए)थांबवून येथे मुस्लिम कब्रस्तानकरीता जागा आरक्षित करण्यात यावी, अशी मागणी नगरविकास आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मुंबई मुस्लीम समाजातर्फे निवेदन देवून करण्यात आली.
दफनभूमीसाठी जागा आरक्षित करावी
निवेदनाचा आशय असा की, मुक्ताईनगर शहरातील मुस्लिम बांधवांची लोकसंख्या दहा हजारावर असून मुक्ताईनगरचे तीन टप्प्यात पुनवर्सन झालेले आहेत. त्यात फक्त पहिल्या टप्प्यात 20 आर.जागा ही मुस्लिम कब्रस्तानासाठी देण्यात आलेली आहे. त्याच प्रकारे दुसरी जागा सुद्धा कब्रस्तानसाठी देण्यात आली परंतु त्यावर चाळीस ते पन्नास वर्षापासून हिंदू बांधवांनी पक्के बांधकाम केल्याने ते काढणे शक्य नाही कारण ती जागा हिंदू लोकांच्या रहिवासाशेजारी आहे. कब्रस्तानला लागूनच गट नंबर 373/1 सदर गट नंबर हा मुस्लिम कब्रस्तान (दफनभूमी) करीता आरक्षित करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. भविष्यात प्रेत दफन करण्यासाठी जागाच शिल्लक नाही तर प्रेतांची विटंबना होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे अल्पसंख्यांक समाजाचा विचार करून व भविष्याचा विचार करून सदर गट हा अत्यंत सोयीचा व मुस्लिम कब्रस्तानला लागुन व मुस्लीम वस्तीत लागून असल्यामुळे या गटाला अंतिम एन.ए. (बिनशेती) परवानगी न देता येथे मुस्लिम समाजाच्या कब्रस्तानासाठी शासन स्तरावर कार्यवाही करावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. निवेदन निवेदन सादर करताना विधानसभा संपर्क प्रमुख चव्हाण साहेब, शेख शकुर जमादार, आसीफ खान इस्माईल खान, अफसर खान, हकीम चौधरी, सलीम खान, शकील मेंबर आदी उपस्थित होते.



