धक्कादायक : मुलाला ऐकू येत नसल्याने मुलांसह पत्नीला विषारी इंजेक्शन देत डॉक्टरांची आत्महत्या


अहमदनगर : मुलाला ऐकू येत नसल्याने आम्हाला समाजात अपराध्यासासारखे व सतत अपमानास्पद वाटत असल्याने आम्ही आत्महत्या करीत असल्याची चिठ्ठी लिहित डॉक्टरांनी आपल्या दोन मुलांसह पत्नीला विषारी इंजेक्शन देत स्वतःदेखील गळफास घेत आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना शनिवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास कर्जत तालुक्यातील राशीन येथे उघडकीस आली. डॉ. महेंद्र जालिंदर थोरात (वय 46), पत्नी वर्षा (42), मुलगा कृष्णा (17), कैवल्य (7) अशी मृतांची नावे आहेत.

आत्महत्येपूर्वी लिहिली चिठ्ठी
आत्महत्येपूर्वी डॉक्टरांनी चिठ्ठी लिहिली असून त्यात मुलाला ऐकू येत नसल्याने अनेक दिवसांपासून आम्ही व्यथित होतो. कृष्णाचेही कशातच मन लागत नव्हते. समाधान वाटत नव्हते; पण हे तो बोलून दाखवत नव्हता. त्याचे हे दु:ख आम्ही वडील, आई म्हणून सहन करू शकत नव्हतो. त्यामुळे मी व माझी पत्नी वर्षा चर्चा करून विचाराने हे आत्महत्येसारखे कृत्य करीत असल्याचे म्हटले आहे.









घटनेने उडाली खळबळ
डॉ. थोरात यांनी रात्रीच दोन मुलांसह पत्नीला विषारी इंजेक्शन दिले व त्यानंतर स्वत: गळफास घेतला असावा, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. सकाळी नऊ वाजले तरी डॉ. थोरात यांच्या घराचा दरवाजा उघडलेला दिसला नाही. त्यामुळे शेजारी राहणारे लोक व मित्रांनी दरवाजा तोडला. घरात डॉ. थोरात यांनी गळफास घेतल्याचे दिसून आले. त्यानंतर शेजार्‍यांनी तत्काळ पोलिसांना फोन केला. पोलिीसही तत्काळ घटनास्थळी आले. डॉ. थोरात यांनी गळफास घेतलेल्या खोलीच्या दरवाजाला डायरीच्या कागदावर थोरात यांनी लिहिलेली चिठ्ठी आढळली. मृत चौघांची उत्तरीय तपासणी कर्जतच्या उपजिल्हा रुग्णालयात करण्यात आली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !