कढोलीच्या शेतकर्‍याची आत्महत्या


जळगाव : एरंडोल तालुक्यातील कढोलीच्या शेतकर्‍याने आत्महत्या केली. लक्ष्मण ओंकार पाटील (70) असे मृत शेतकर्‍याचे नाव असून शनिवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. गेल्यावर्षी कमी पाऊस पडल्याने उत्पन्न घटले तर यावर्षी प्रमाणापेक्षा जास्त पाऊस झाल्याने पिकांची नासाडी होईल. मग कर्ज कसे फेडायचे आणि आजाराची व्याधी असल्यावर राबणार कसे? अशा विवंचनेतून
शेतकर्‍याने टोकाचा निर्णय घेतल्याने मृत्यूपूर्व लिहिलेल्या चिठ्ठीवरून स्पष्ट झाले आहे.

गावाला जातो असे सांगून केली आत्महत्या
लक्ष्मण पाटील यांच्याजवळ दहा भिगे वडीलोपार्जीत शेती आहे. गावाला जातो, असे सांगून ते शुक्रवारी घराबाहेर पडले. शनिवारी सकाळी सव्वा सहा वाजेच्या सुमारास कढोली येथील दुध दुचाकीवरून जळगावला वैजनाथ मार्गे नेत असता कोणी तरी इसम शेताजवळ पडलेला असल्याचे तरुणास दिसले. जवळ जाऊन बघीतल्यानंतर दुचाकीवरील तरूणाने ही माहिती गावात दिली. त्यानंतर लक्ष्मण पाटील यांचे नातेवाईक तसेच गावाचे पोलीस पाटील रामदास सोनवणे हे घटनास्थळी रवाना झाले. त्यानंतर धरणगाव पोलिसांनी घटनेची माहिती दिली.
वाहन मागवून बेशुध्दावस्थेतील लक्ष्मण पाटील यांना आज सकाळी जिल्हा शासकीय रूग्णालयात हलविले असता तपासणीअंती वैद्यकीय अधिकार्‍यांनी पाटील यांना मृत घोषीत केले. या प्रकरणी डॉ. अपूर्वा चित्ते यांनी दिलेल्या खबरीवरून पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. लक्ष्मण पाटील यांच्या पश्चात पत्नी लिलाबाई, मुले विवाहित हिंमत, लिलाधर तसेच विवाहित मुली संगीता , छोटीबाई असा परीवार आहे. शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.


कॉपी करू नका.