खाजगी प्राथमिक शिक्षकांची पतपेढी उपाध्यक्षपदी अजयराव सोमवंशी
चाळीसगाव : चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीच्या व्ही.एच.पटेल प्राथ. विद्यालयातील उपशिक्षक अजयराव आनंदराव सोमवंशी यांची जळगाव जिल्हा खाजगी प्राथमिक शिक्षकांच्या पेतढीच्या उपाध्यक्षपदी फेरनिवड करण्यात आली. बुधवारी संचालक मंडळाच्या मासिक सभेत बिनविरोध निवडीची प्रक्रिया पार पाडली. गेल्यावर्षीही सोमवंशी यांची उपाध्यक्षपदी निवड झाली होती.
आगामी काळात आणखी काही चांगले निर्णय घेणार
विद्यमान संचालक मंडळाच्या कार्यकाळात सभासद हिताचे काही निर्णय घेण्यात आले. व्याजदर, कर्जाची मर्यादा, गुणवंतांचा गौरव, सभासद करण्याची प्रक्रिया आदिंमध्ये सुधारणा केली गेली. यात उपाध्यक्ष म्हणून सोमवंशी यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली. निवडीनंतर त्यांचा सत्कार करण्यात आला. चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीच्या मनेजिंग बोर्डाचे चेअरमन नारायणदास अग्रवाल यांच्यासह शाळा समितीचे चेअरमन राजेंद्र चौधरी, संस्थेच्या बांधकाम समितीचे चेअरमन योगेश अग्रवाल यांनी अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या. सभासद हितासाठीच आपण बांधील असून येत्या काळात काही चांगले निर्णय संचालक मंडळाच्या मदतीने घेणार आहोत. अशी प्रतिक्रिया अजयराव सोमवंशी यांनी यावेळी व्यक्त केली. राष्ट्रीय सह. शिक्षण प्रसारक मंडळाचे ज्येष्ठ संचालक आनंदराव सोमवंशी यांचे ते सुपूत्र आहे.

