कोरोना रुग्णांसाठी मुस्लिम मणियार बिरादरी करीत असलेले कार्य प्रेरणादायी
नूतन महापौर जयश्री महाजन : एचआरसीटी कुपण वाटपाला प्रारंभ
जळगाव : जळगाव जिल्हा मणियार बिरादरीने कोरोना रुग्णांसाठी एकाच आठवड्यात दुसरा उपक्रम म्हणजे एचआरसीटी करणार्या रुग्णांना फक्त 1800/- रुपयांमध्ये तपासणी उपलब्ध करून देत आहे तसेच तीनच दिवसांपूर्वी रेमडीसीवर इंजेक्शन हे सुध्दा फक्त 1050/-रुपयात उपलब्ध करून दिल्यामुळे त्यांच्या या दोन्ही कामाचे मी जळगावची प्रथम नागरीक म्हणून स्वागत व अभिनंदन करते, असे प्रेरणादायी उद्गार जळगाव शहराच्या नवनिर्वाचित महापौर जयश्री महाजन यांनी केले. त्यांच्या कार्यालयात एचआरसीटी कुपण वाटप प्रसंगी त्या बोलत होत्या.
यांची होती उपस्थिती
यावेळी नगरसेवक सुनील महाजन, प्रशांत नाईक, मणियार बिरादरीचे अध्यक्ष फारुक शेख, बिरादरीचे युवा संचालक अॅड.आमिर शेख व मोहसीन शेख यांची उपस्थिती होती.

सिटीस्कॅन व रेमडीसीवरसाठी रुग्णांचा भरघोस प्रतिसाद
कोरोना रुग्णांसाठी रेमडीसीवर इंजेक्शन सुद्धा जळगाव जिल्हा मणियार बिरादरीने फक्त 1050/- रुपयात उपलब्ध करून दिलेला आहे तसेच एचआरसिटी सुद्धा फक्त 1800/- रुपयात उपलब्ध करून दिल्याने या दोन्ही तपासणीसाठी रुग्णांचा भरघोस प्रतिसाद मिळत आहे व खर्या अर्थाने रुग्णांसोबत समाजाची सेवा करण्याचा आनंद मिळत असल्याचे बिरादरीचे अध्यक्ष फारुक शेख यांनी सांगितले.
सारा हॉस्पिटल व डे नाईट मेडिकलचे सहकार्य
या दोन्ही उपक्रमासाठी डे नाईट मेडिकल स्टोरचे संचालक समी अजीजी व एचआरसिटी साठी सारा मल्टी हॉस्पिटलचे डॉ.मिनाझ पटेल यांचे सहकार्य मिळत आहे. रुग्ण व त्यांच्या नातेवाईकाना अधिक माहितीसाठी 9423185786, 9423487786 किंवा 9423978611 यावर संपर्क साधावा, असे आवाहन फारूक शेख यांनी केले आहे.
