सीमांकित अभिन्यास मंजुरीसाठी भुसावळात उपोषण
एका उपोषणार्थीची प्रकृती खालावली : नगराध्यक्षांनी दिली भेट
भुसावळ- जुना सतारे भागातील शेतकरी कुंदन वासुदेव पाटील यांच्या साकेगाव शिवारातील सर्वे नं.299/3, 301/1 व 306/4 या तिन्ही गटांचे तसेच भूषण नीळकंठ पाटील यांच्या 304/1 या गटाचे अभिन्यास मंजुरीचे प्रकरण मंजूर करण्याच्या मागणीसाठी प्रांताधिकारी कार्यालयासमोर गेल्या तीन दिवसांपासून आमरण उपोषण सुरू आहे. बुधवारी नगराध्यक्ष रमण भोळे यांनी उपोषणार्थींची भेट घेवून चर्चा केली.
आश्वासनाची पूर्ती न केल्याने उपोषण
साकेगाव शिवारातील सर्वे नं.299/3, 301/1 व 306/4 या तिन्ही गटांचे तसेच भूषण नीळकंठ पाटील यांच्या 304/1 या गटाचे अभिन्यास मंजुरीचे प्रकरण वर्षभरापासून पालिकेत पडून आहे. या प्रकरणी सबंधीत दोन्ही शेतकरी तसेच त्यांचा कुटूंबीयांनी गुरुवार, 12 सप्टेंबर रोजी पालिकेसमोर उपोषण केले होते. त्यावेळी स्थळ पाहणी झाल्यानंतर पुढील योग्य ती कारवाई लवकरात लवकर करण्यात येईल, असे लेखी पत्र मुख्याधिकारी करुणा डहाळे यांनी दिले होते. त्यावेळी आंदोलकांनी उपोषण व आत्मदहनाचा इशारा तूर्त मागे घेतला मात्र त्यानंतरही कारवाई न झाल्यास रविवारपासून प्रांताधिकारी कार्यालयाबाहेर पूर्ववत आमरण उपोषण छेडण्यात आले आहे. दरम्यान, उपोषणार्थी भूषण नीळकंठ चौधरी यांची मंगळवारी प्रकृती खालावल्याने त्यांना रुग्णालयात हलवण्यात आले. दरम्यान, कुंदन वासुदेव पाटील यांनी छेडलेल्या आमरण उपोषणाला मधुकर किसन पाटील, विद्या मधुकर पाटील, तिलोत्तमा वासुदेव पाटील, लिलावती अशोक पाटील, देविदास पंढरीनाथ पाटील, प्रवीण किसन पाटील, सुधाकर किसन पाटील, योगराज अशोक पाटील व 40 नागरीकांनी पाठिंबा दर्शवला आहे.