हाजी-हाजी करीत नसल्याने गिरीशभाऊंनी आपल्या मतदारसंघात पहावे !
माजी मंत्री एकनाथराव खडसेंचा टोला : क्लीप वाद जिल्ह्यात रंगला
जळगाव : गिरीश भाऊंना राजकारणात जन्माला मी आणले. त्यांच्या राजकारणात आर्थिक मदत मी दिली. त्यांच्या प्रचारासाठी गल्लोगल्ली मी फिरलो म्हणून आज गिरीश भाऊ दिसत आहेत. मी कोणाची हाजीहाजी करत नाही शिवाय कोणाचे पाय चाटत नाही त्यामुळे गिरीश भाऊ तुम्ही माझी काळजी करण्याची गरज नाही. महाजनांनी आधी आपल्या मतदारसंघात पहावे, असा टोला माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी महाजनांना लगावत त्यांच्या टिकेला प्रत्युत्तर दिले आहे.
मतदारसंघात महाजनांनी लक्ष घालण्याची गरज
ऑडीयो क्लीपवरून दोन नेत्यांमध्ये वाद रंगला आहे शिवाय खडसेंना आलेल्या एका कॉलवरून माजी मंत्री खडसेंनी महाजनांवर टिका केली होती. खडसे म्हणाले की, मी जे ऑडिओ रेकॉर्डमध्ये बोललो आहे, जामनेर मतदारसंघातून मला नागरीकांचे फोन येत आहेत. तालुक्यात पाणीटंचाईची समस्या आहे. कोरोनाच्या काळात दिवसेंदिवस तिथे रुग्णांचे अक्षरक्ष: मुर्दे पडत असताना गिरीश महाजन तिकडे पश्चिम बंगालमध्ये प्रचारासाठी फिरत असल्याचेही खडसे म्हणाले. गिरीश महाजन यांचा आपल्याला सर्व इतिहास माहिती असल्याचेही ते म्हणाले. महाजनांनी मतदारसंघात लक्ष घालण्याची गरज असल्याचेही ते म्हणाले.


