ओबीसी नेते छगनराव भुजबळांना धमकी देणार्‍या चंद्रकांत पाटलांचा निषेध


गुन्हा दाखल करा : वरणगावात महाराष्ट्र माळी समाज महासंघ, समता परीषदेचे पोलिस उपअधीक्षकांना निवेदन

वरणगाव : ओबीसी नेते छगनराव भुजबळ यांच्याबद्दल अतिशय उद्धट आणि मगरुरीच्या भाषेत बेताल वक्तव्य करणार्‍या भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा महाराष्ट्र माळी समाज महासंघ, समता परीषद यांच्या वतीने निषेध करण्यात आला. पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करावा, या मागणीचे निवेदन वरणगाव पोलीस स्टेशन येथील डीवायएसपी नितीन गणापुरे यांना मंगळवारी देण्यात आले.

विसरू नका, गृहमंत्रीदेखील जामिनावर
महाराष्ट नव्हे तर संपूर्ण देशाचे ओबीसी नेते असलेले महाराष्ट्रचे मंत्री छगनराव भुजबळ यांनी पश्चिम बंगाल येथील लागलेल्या निवडणूक निकालाबद्दल ममता बॅनर्जी या ‘झाशीच्या राणी सारखे लडल्या’ आणि निवडणुकीत यश मिळवले, अशी प्रतिक्रिया माध्यमांना दिल्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी छगनराव भुजबळ यांना अतिशय उद्धट भाषेत धमकी देऊन ‘भुजबळ तुम्ही जामिनावर बाहेर आहेत विसरू नका, तुम्हाला आम्ही पाहून घेऊ’ अशी धमकी दिली. चंद्रकांत पाटील यांनी विसरू नये की, देशाचे गृहमंत्री अमित शहा देखील जामिनावर बाहेर आहेत. छगनराव भुजबळ यांची चंद्रकांत पाटील यांनी माफी मागावी, तसेच त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा. अन्यथा पाटील यांना महाराष्ट्रामध्ये फिरू देणार नाही. असे डीवायएसपी नितीन गणापुरे यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे.

यांच्या निवेदनावर स्वाक्षर्‍या
निवेदनावर माळी महासंघाचे जळगांव जिल्हा उपाध्यक्ष तथा समता परीषदेचे तालुकाध्यक्ष संतोष माळी, माळी महासंघाचे जिल्हा संघटक प्रल्हाद माळी, माळी समाजाचे अध्यक्ष संजय माळी, भुसावळ तालुकाध्यक्ष विजय माळी, उपाध्यक्ष निलेश माळी, वरणगाव शहराध्यक्ष सचिन माळी, टिनू माळी, आकाश महाजन, विवेक माळी, विशाल माळी, भुषण माळी, वैभव माळी यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !