एन्काऊंटर स्पेशालिस्ट दया नायक यांची गोंदियात बदली
मुंबई : दहशतवादी विरोधी पथकातून थेट गोंदियात एन्काऊंटर स्पेशालिस्ट दया नायक यांची बदली करण्यात आली. बदली प्रशासकीय कारणास्तव केल्याचे सांगण्यात येत आहे. सप्टेंबर 2019 मध्ये दया नायक यांची काल मुंबई शहर येथील अंबोली पोलीस ठाण्यातून दहशतवाद विरोधी पथकात बदली करण्यात आली होती. विशेष म्हणजे, नव्वदीच्या दशकातील 83 गुंडांना यमसदनी धाडून गुन्हेगारी जगतात दया नाईक यांनी दबदबा निर्माण केला होता. मात्र, कालांतराने बेहिशेबी मालमत्तेच्या प्रकरणात अडकून दया नाईक यांना पोलीस दलातून निलंबन करण्यात आले होते.
बेहिशेबी मालमत्तेने झाले होते निलंबन
कर्नाटक येथे आपल्या आईच्या नावे बांधलेल्या शाळेचे 2006 मध्ये सुप्रसिध्द अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या हस्ते उद्घाटन करणं त्यांच्या अंगाशी आलं. एका पोलीस अधिकार्याकडे शाळा बांधण्यासाठी एवढे पैसे आले कुठून? असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या चौकशीचा (एसीबी) ससेमिरा त्यांच्यामागे लागला. गुंडांचा कर्दनकाळ अशी ओळख बनविलेल्या नायक यांना बेहिशेबी मालमत्तेच्या वादाने नाउमेद झाले. या प्रकरणी त्याच्यावर अटकेची कारवाई होऊन मुंबई पोलीस सेवेतून त्यांना निलंबित करण्यात आले. जामिनावर सुटल्यानंतर तर ते अज्ञातवासात गेले होते. अलीकडेच काही वर्षांपूर्वी ते पुन्हा पोलीस खात्यात रुजू झाले.





