38 वर्षीय तरुणाची आत्महत्या : पत्नीसह दाम्पत्याविरुद्ध गुन्हा
यावल : पत्नी घर सोडून निघून गेल्याने वैफल्यग्रस्त अवस्थेत तालुक्यातील थोरगव्हाण येथील भानुदास मंगल चौधरी (38) यांनी मनवेल रस्त्यावरील स्वतःच्या शेतातील निंबाच्या झाडाला गळफास घेत आत्महत्या केली होती. आत्महत्येपूर्वी त्यांनी सुसाईड नोट लिहून ठेवली होती व त्या सुसाईड नोटच्या आधारे यावल पोलिसांनी मयत भानुदास चौधरी यांच्या पत्नीसह चोपडा येथील दाम्पत्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. मयत भानुदास चौधरी यांच्या पत्नीचे संशयीत आरोपी तुषार देशमुखशी अनैतिक संबंध होते व आरोपीची पत्नी या अनैतिक संबंधास मदत करीत असल्याने तिलाही या गुन्ह्यात आरोपी करण्यात आले.
सुसाईड नोटवरून दाखल झाला गुन्हा
थोरगव्हाणच्या भानुदास मंगल चौधरी (38) यांनी शेतात आत्महत्या करण्यापूर्वी सुसाईड नोट लिहिली होती. त्यात पत्नी आपल्याला सोडून निघून गेली असून या बाबीला चोपडा येथील दोन जण जबाबदार असल्याचे म्हटले होते व त्यांच्या त्रासामुळे मी आत्महत्या करीत असल्याचे नमूद केले होते. पोलिसांनी सुसाईड नोटच्या आधारे आरोपी तुषार संजय देशमुख, योगीता तुषार देशमुख (सर्व रा.तारामती नगर, चोपडा, ह.मु.नाशिक) व मयताची पत्नी ललिता भानुदास चौधरी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. या प्रकरणी योगराज रामकृष्ण चौधरी (थोरगव्हाण, ता.यावल) यांनी फिर्याद दिली. तपास निरीक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक जितेंद्र खैरनार करीत आहेत.



