भुसावळातील अनियंत्रीत गर्दी कोरोनाला निमंत्रण
भुसावळसाठी लस मिळाल्या अवघ्या 3500 मात्र गर्दी जमली हजाराेंंच्या पटीने
भुसावळ : शहरात कोरोना रुग्णांची सातत्याने वाढणारी गर्दी पाहता नागरीक कोविड लस घेण्यास प्राधान्य देत आहेत मात्र लसींचा तुटवडा जाणवत असतानाच गुरुवारी शहरात लस येत असल्याची माहिती नागरीकांना मिळताच त्यांनी पहाटे पाच वाजेपासून शहरातील विविध केंद्रावर तोबा गर्दी केली. लस घेतल्यामुळे कोरोनापासून बचाव होणार असलातरी नागरीकांनी रांग लावताना उडवलेला सोशल डिस्टन्सचा बोजवारा व अनियंत्रीत गर्दी मात्र कोरोना निमंत्रण देणारी ठरेल यात शंकाच नाही. प्रशासनाने गर्दी नियंत्रणासाठी व्यापक उपाययोजना न केल्याने भविष्यात ही बाब शहरवासीयांसाठी धोकेदायक ठरू शकण्याची भीती आहे.
पहाटेपासून लागल्या नागरीकांच्या रांगा
गुरुवारी लस येत असल्याच्या पार्श्वभूमीवर व दुसरा डोस घेण्यासाठी नागरीकांनी शहरातील बद्री प्लॉट व महात्मा फुले आरोग्य केंद्राबाहेर पहाटे पाचपासूनच रांगा लावल्या. यात 18 वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या युवकांचाही मोठ्या प्रमाणावर सहभाग राहिला. आरोग्य केंद्रावर गेल्यावरच नाव नोंदणी केली जाईल, असे युवकांना वाटल्याने सोबत आधारकार्ड घेऊन बहुतांश युवक लसीकरणासाठी केंद्रावर आले मात्र ऑनलाईन नोंदणी असलेल्या युवकांनाच लसीकरण केले जाणार असल्याचे कळताच ते माघारी हताशपणे परतले. महात्मा फुले आरोग्य केंद्रावर कोविडचा पहिला डोस मिळाला असलातरी कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस न आल्याने जमा झालेल्या नागरीकांनी पालिकेच्या सावळा-गोंधळ कारभाराबाबत संताप व्यक्त केला.



पालिका दवाखान्यात लावला बंदोबस्त
नगरपालिका दवाखान्यात गुरूवारी सकाळी नागरीकांची झुंबड उडून गोंधळ उडाल्यानंतर शहर पोलिस ठाण्यातून पोलिस व होमगार्ड यांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पोलिस निरीक्षक बाबासाहेबे ठोंबे यांनी पालिका दवाखान्यात जात गर्दीला समजावत शांततेचे आवाहन केले. यावेळी डॉ. किर्ती फलटणकर यांनीही शांततेचे आवाहन केले. जिल्हा प्रशासनाकडून कोवीशिल्डचे तीन हजार 100 डोस मिळाले. यात पालिका दवाखाना 2 हजार 400, रेल्वे हॉस्पीटल 500 तर आयुध निर्माण भागात 200 लस मिळाल्या.
पहिल्या टप्प्यात 30 टक्के लसीकरण
शहरातील विविध केंद्रावर पहिला डोस घेणार्या 18 ते 44 वयोगटातील नागरीकांसाठी कोव्हॅक्सिनचे 400 डोस आले मात्र दुसरा डोस घेणार्यांसाठी कोव्हॅक्सिनचा डोस आलेला नाही. पहिल्या टप्यातील 30 टक्के तर सेकंड डोसचे 70 टक्के लसीकरण करण्यात आले. 18 ते 45 वयोगटातील ऑनलाईन नाव नोंदणी केल्यानंतर ती यादी आरोग्य विभागाकडे येते व नंतर डोस दिला जातो. शहरातील खडका रोड आरोग्य केंद्र, यावल रोडवरील पालिका दवाखाना, वरणगाव रोडरवरील प्राथमिक आरोग्य केंद्र, शिवदत्त नगर येथे पहिल्या डोसाचे लसीकरण झाले.

