पालनजीक पोलिसांवर गोळीबार संशयित पसार
संशयित दरोड्याच्या उद्देशाने आल्याचा संशय
रावेर : रावेर-पाल आदिवासी भागात सहस्त्रलिंगनजिक सोमवारी मध्यरात्री तीनच्या सुमारास अज्ञात व्यक्तीनी पोलिसांच्या दिशेने फायर केल्याची घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. फायर करताच संशयित चारही पसार झाले आहे. दरम्यान, गोळीबार करणारे संशयित दरोड्याच्या उद्देशाने आल्याची शक्यता आहे.
गोळीबाराने उडाली खळबळ
रात्रीची पेट्रोलिंग करून पोलिस कॅमेरा व्हॅन ( एमएच १९ एम ०६८१) ने रावेरच्या दिशेने येत असतांना रावेरकडून पालकडे जाणा-या दोन मोटरसायकल दिसल्या त्यातील एका मोटरसायकला पोलिसांनी थांबविण्याचा प्रयत्न केला असता मोटार सायकलस्वार जोरात घेऊन पालकडे निघुन गेले. त्यानंतर त्यांच्या मागुन येणारी मोटारसायकल सुमारे तिस फुट अंतरावर असताना मागे बसलेल्या संशयितांनी पोलिसांच्या दिशेने बंदुकीने फायर केला व मोटारसायकल चालक याने मोटर सायकल जागे वरुन जोराने यु-टर्न घेत असतांना स्लीप होवुन त्यांच्या जवळील बंदुक जमिनीवर खाली पडून तुटली व मोटर सायकलवर बसलेले संशयित पळुन गेले. त्यांचा पाठलाग पोलिसांनी केला असता घटनास्थळावरुन संशयित पसार झाले. याबाबत श्रीराम कांगणे यांच्या फिर्यादी वरुन अज्ञात चार जणां विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.



