आमदार प्रताप सरनाईक यांच्या लोणावळ्यातील बंगल्यावर ईडीचा छापा


पुणे : शिवसेनेचे प्रवक्ते तथा आमदार प्रताप सरनाईक यांच्या लोणावळा येथील बंगल्यावर ईडीच्या अधिकार्‍यांनी छापा टाकल्याची माहिती समोर आली आहे. बेहिशोबी मालमत्ता प्रकरणामुळे हा छापा टाकण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. टॉप्स ग्रुप(सिक्युरीटी) कंपनीच्या आर्थिक गैरव्यवहारांबाबत ईडीकडून चौकशी केली जात आहे. सक्तवसुली संचलनालयाने(ईडी) नोव्हेंबर 2020मध्ये बेहिशोबी मालमत्ता प्रकरणात आमदार प्रताप सरनाईक यांच्या घर आणि कार्यालयावर धाडी टाकल्या होत्या. त्यानंतर प्रताप सरनाईक यांच्यासह त्यांचा मुलगा विहंग सरनाईक यांची चौकशी ईडीकडून करण्यात आली होती. ईडीने टॉप्स ग्रुप आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात 25 नोव्हेंबरला अमित चांदोळे यांचीही चौकशी केली होती. त्यानंतर अमित चांदोळे यांना अटकही करण्यात आली होती. अमित चांदोळे हे प्रताप सरनाईक यांचे व्यावसायिक भागीदार आहेत. धाडी आणि चौकशीनंतर यावरून राज्यात बरंच राजकारण पेटलं होतं. मात्र, नंतर या प्रकरणाची चर्चा थंडावली होती. त्यानंतर मंगळवारी अचानक ईडीचे अधिकार प्रताप सरनाईक यांच्या लोणावळ्यातील बंगल्यावर दाखल झाले.

175 कोटींच्या कंत्राटासाठी 7 कोटींची लाच
टॉप्स ग्रुपकडून एमएमआरडीएला 175 कोटींच्या कंत्राटासाठी 7 कोटींची लाच देण्यात आल्याची माहिती समोर आली होती. टॉप्स सिक्युरिटीचे सेवानिवृत्त कर्मचारी रमेश अय्यर यांनी 28 ऑक्टोबरला तशी तक्रार दाखल केली होती. त्या तक्रारीनंतर मुंबई पोलिसांनी एफआयआर दाखल केला होता. राहुल नंदा यांच्या टॉप्स सिक्युरिटीकडून 100 पैकी फक्त 70 टक्के गार्ड्स वापरले जायचे. 30 टक्के गार्ड्सचा वापर केला जात नव्हता. जवळपास दीडशेच्या आसपास गार्ड्स वापरले जात नव्हते. मात्र त्यांची रक्कम सगळी टॉप्स ग्रुपला मिळत होती. त्यातील काही रक्कम लाच म्हणून अमित चांदोळे आणि संकेत मोरे यांना मिळत असल्याचीही माहिती तपासातून समोर आली होती. यापैकी काही रक्कम प्रताप सरनाईक यांना मिळत असल्याचा संशय ईडीला आहे. त्याचा तपास सध्या सुरू आहे.







 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !