खुनातील आरोपी बाळ बोठेने कारागृहातून केले फोन : आठ जणांविरुद्ध गुन्हा
अहमदनगर : रेखा जरे हत्याकांडातील आरोपी बाळ बोठे पारनेर उपकारागृहात मोबाईल फोनचा वापर केल्याचे आढळले असून या पूर्वी दाखल असलेल्या गुन्ह्यात त्यालादेखील आरोपी करण्यात आले आहे. गत महिन्यात नगर ग्रामीणचे पोलीस उपअधीक्षक अजित पाटील, पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे व पोलीस निरीक्षक घनश्याम बळप यांनी पारनेर उपकारागृहाची तपासणी केली असता कारागृहातील आरोपी सौरभ पोटघन व अविनाश कर्डिले यांच्याकडे दोन मोबाईल सापडले तर हे मोबाईल कारागृहात आरोपींना जेवण देणारे सुभाष लोंढे, प्रवीण देशमुख यांनी ते आरोपींना दिल्याचे समोर आले. यावेळी पारनेर पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल होता. मोबाइल नंबरचे पोलिसांनी सीडीआर काढल्यानंतर बोठे यानेही त्याचा वापर केल्याचे निष्पन्न झाल्याने त्याला आधी दाखल असलेल्या गुन्ह्यात आरोपी करण्यात आले. एकूण आठजणांविरोधात पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.