कौटुंबिक वादातून दिराने केला वहिनीचा खून
जळगाव : कौटुंबिक वादातून दिरानेच आपल्या वहिनीचा डोक्यात कुऱ्हाड मारून खून केल्याची घटना शहरातील मयूर कॉलनीत शुक्रवारी रात्री घडली. या घटनेत योगिता मुकेश सोनार (वय ३९, रा. मयूर कॉलनी) या महिलेचा मृत्यू झाला. खून प्रकरणी पोलिसांनी आरोपी दीपक लोटन सोनार (३८) यास अटक केली आहे. घटनास्थळी अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांच्यासह पोलिस अधिकाऱ्यांनी धाव घेतली.
भांडण झाल्याने वहिनीच्या डोक्यात मारली कुराड
योगिता मुकेश सोनार (वय ३९, रा. मयूर कॉलनी) या आपली सासू आणि दिरासह राहत होत्या. 6 महिन्यांपूर्वी त्यांचे पती मुकेश सोनार यांचे अपघाती निधन झाल्यामुळे त्या आपल्या आठ वर्षाच्या मुलासह दीर आणि सासूसोबत वास्तव्याला होत्या. मध्यंतरी घरात नेहमी किरकोळ कारणावरून वाद होत होते. त्यातच शुक्रवारी पुन्हा योगिता आणि त्यांचा दीर दीपक लोटन सोनार (वय ३८) यांच्यात वाद झाला. यामुळे संतापलेल्या दीपकने आपल्या वहिनीच्या डोक्यात कुर्हाडीने घातल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. दीपकला रामानंदनगर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरा सुरू होते.





