मेहुणबारेच्या लाचखोर हवालदारासह पंटरला एका दिवसाची पोलिस कोठडी

मेहुणबारे : हाणामारीच्या गुन्ह्यात तक्रारदाराला मदत करण्यासह वाढीव 354 कलम न लावण्यासाठी 15 हजारांची लाच स्वीकारल्याप्रकरणी मेहुणबारे पोलिस ठाण्यातील हवालदार शालिकराम व्यंकटराव कुंभार (टाकळी प्रचा, खरजाई) व खाजगी पंटर बाळासाहेब भाऊसाहेब देशमुख (चाळीसगाव) यांना सोमवारी दुपारी मेहुणबारे पोलिस ठाण्यातच अटक करण्यात आली होती. आरोपींना मंगळवारी जळगाव न्यायालयात हजर केले असता एका दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
पोलिस ठाण्यातची स्वीकारली होती लाच
मालेगाव तालुक्यातील 40 वर्षीय तक्रारदाराविरुद्ध मेहुणबारे पोलिसात गुन्हा दाखल असून या गुन्ह्यात सहकार्य करण्यासह वाढीव कलम न लावण्यासाठी आरोपी हवालदाराने 21 रोजी लाच मागितली होती. तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार नोंदवल्यानंतर 23 रोजी मेहुणबारे पोलिस ठाण्यात आरोपीने पंटराकडे लाच देण्याचा इशारा केल्यानंतर आधी पंटर व नंतर हवालदारास अटक करण्यात आली होती. ही कारवाई जळगाव एसीबीचे पोलिस उपअधीक्षक जी.एम.ठाकुर, पोलिस निरीक्षक संजोग बच्छाव, मनोज जोशी, सुनील शिरसाठ, प्रशांत ठाकुर, प्रवीण पाटील, नासीर देशमुख, ईश्वर धनगर आदींच्या पथकाने केली. दरम्यान, आरोपी हवालदार व पंटराला न्यायालयाने एका दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.
