दहा हजारांच्या रोकडसह मटण व दारूची लाच भोवली : मंडळ अधिकार्‍यासह तलाठी एसीबीच्या जाळ्यात


खामगाव : तक्रारदार यांच्या भावाच्या नावे खरेदी केलेल्या प्लॉटची सातबारा नोंद घेऊन फेरफार नक्कल देण्यासाठी दहा हजारांची लाच व व्हिस्कीसह मटण पार्टीची मागणी करणार्‍या लाखनवाडा मंडळाधिकारी विलास साहेबराव खेडेकर (52, रा. गजानन कॉलनी, खामगाव) व तलाठी बाबुराव उखर्डा मोरे (36, शिर्ला नेमाणे , ता.खामगाव, रा. किन्ही महादेव, ता.खामगाव) यांना लाच स्वीकारताच बुलढाणा एसीबीच्या पथकाने मुसक्या आवळल्या.

यापूर्वीच स्वीकारली होती दहा हजारांची लाच
शिर्ला नेमाने येथील 42 वर्षीय तक्रारदाराने बुलडाणा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे या संदर्भात तक्रार दिली होती. लाखनवाडा येथे कार्यरत मंडळ अधिकारी विलास खेडेकर (52, रा.गजानन कॉलनी खामगाव) व शिर्ला नेमाने येथे कार्यरत तलाठी बाबुराव मोरे (36, रा. किन्ही महादेव) यांनी तक्रारदाराच्या भावाच्या नावाने खरेदी केलेल्या प्लॉटची नोंद सातबारावर घेवून फेरफार नक्कल देण्यासाठी 10 हजाराची लाच व दारू मटणाची पार्टी मागितली. 10 हजार यापुर्वीच त्यांनी स्विकारल्याची देखील तक्रार देताना नमूद करण्यात आले होते. पथकाने लाच पडताळणी करीत सापळा रचला व पिंप्री धनगर येथील प्रल्हाद चव्हाण यांच्या शेतातील झोपडी समोर मंडळ अधिकारी खेडेकर व तलाठी मोरे या दोघांना दारू व मटणावर ताव मारतांना अटक केली. यावेळी पथकाने तेथून दोन व्हिस्कीच्या बाटल्या व मांसाहारी जेवणाचे पदार्थ हस्तगत केले. या कारवाईमुळे महसूल विभागात खळबळ उडाली आहे.







यांच्या पथकाने केला सापळा यशस्वी
ही कारवाई एसीबीचे पोलिस उपनिरीक्षक संजय चौधरी यांच्या नेतृत्वात पोलिस निरीक्षक सचिन इंगळे, विलास साखरे, प्रवीण बैरागी, मोहम्मद रीझवान, विनोद लोखंडे, अझरुद्दीन काझी, नितीन शेटे व शेख अर्शद आदींच्या पथकाने यशस्वी केला.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !