भारतातील सर्वात जुनी रेल्वे गाडी पंजाब मेलचे 110 व्या वर्षात पदार्पण
नवीन सुरक्षित एलएचबी कोचमुळे उजळून निघाली रेल्वे गाडी
भुसावळ : भारतीय रेल्वेतील सर्वात जुनी गाडी अशी ओळख असलेल्या मुंबई ते हावडा धावणार्या पंजाब मेलने 1 जूनला 110 व्या वर्षांत पदार्पण केले. दरम्यान, जुने डबे सोडून या गाडीला मंगळवारपासून नवीन एलएचबी कोच लावण्यात आले. या नवीन आकर्षक डब्यांमुळे ही गाडी उजळून निघाली असून प्रवाशांना अधिक सुरक्षित व सुखद प्रवासाचा अनुभव मिळणार आहे.
सुरूवातीला अवघे 96 प्रवासी घेवून धावायची गाडी
ग्लॅमरस फ्रंटियर मेलपेक्षा 16 वर्षांनी अधिक जुनी असलेली आणि पूर्वी मुंबई ते पेशावर चालणारी पंजाब मेल 1 जून 1912 रोजी बॅलार्ड पियर मोल स्थानकातून प्रथमच सुटली. पंजाब मेल ही बॅलार्ड पियर मोल स्टेशन म्हणजे जीआयपी रेल्वे सेवांसाठी एक केंद्र होते. तिला तेव्हा पंजाब मेल किंवा पंजाब लिमिटेड संबोधन जायचे. ही गाडी मुंबईच्या बॅलार्ड पियर मोल स्थानकापासून ते पेशावरकडे जीआयपी मार्गे सुमारे 47 तासांत 2 हजार 496 किमी अंतर कापत असे. ट्रेनला सहा डबे जोडलेले असत. त्यापैकी तीन प्रवासी व टपालासाठी होते. तीन प्रवासी डब्यांतील प्रवाशांची क्षमता फक्त 96 प्रवाशांची होती. प्रथम श्रेणीच्या व दोन बर्थ असलेल्या कंपार्टमेंटसह बनवलेले सर्व डब्बे एका टोकापासून दुसर्या टोकापर्यंत जाऊ शकणारे (कॉरीडॉर कार) होते.



फाळणीपूर्वी वेगवान गाडी
फाळणीपूर्व काळात पंजाब लिमिटेड ही ब्रिटीश भारतातील सर्वात वेगवान ट्रेन होती. पंजाब लिमिटेडचा मार्ग जीआयपी ट्रॅकवरुन मोठ्या प्रमाणात जात होता. पेशावर छावणी येथे संपण्यापूर्वी इटारसी, आग्रा, दिल्ली आणि लाहोरमधून जात होता. 1914 पासून या ट्रेनचे बॉम्बे व्हीटी (आता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई) येथून प्रस्थान व आगमन होऊ लागले. त्यानंतर ही गाडी पंजाब लिमिटेड ऐवजी पंजाब मेल म्हणून ओळखली जाऊ लागली.

