रावेर तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट भरपाई मिळावी


हवामानावर आधारीत फळ पीक विमा कंपनी मॅनेजर यांच्याशी माजी प्रभारी नगराध्यक्ष अनिल चौधरी यांची चर्चा

रावेर : केळी पट्ट्यात पंधरवड्यापूर्वी आलेल्या वादळी वाऱ्याने केळी उत्पादकांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने केळी उत्पादक पुन्हा संकटात सापडले आहे. माय-बाप प्रशासनाने नुकसानीचे पंचनामे केले असले तरी प्रत्यक्षात केळी उत्पादकांना मदत मिळणार कधी? हा खरा प्रश्न आहे. केळी फळ पीक विमा असला तरी जाचक निकषांमुळे नुकसान होऊनही केळी उत्पादकांना पाहिजे त्या प्रमाणात भरपाई मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता व्यक्त होत असतानाच भुसावळचे माजी प्रभारी नगराध्यक्ष सुनील चौधरी यांनी फळ पीक विमा योजना कंपनीचे मॅनेजर देविदास कोळी यांच्याशी निवासस्थानी चर्चा केली. शेतकऱ्यांना सरसकट भरपाई मिळावी, अशी अपेक्षा प्रसंगी चौधरी यांनी व्यक्त केली.

नुकसानीमुळे केळी उत्पादक पुन्हा संकटात
रावेर तालुक्यातील पाल, गुलाबवाडी, के-हाळा, अहिरवाडी भागात वादळी वारा व पावसामुळे केळी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. केळी उत्पादकांच्या झालेल्या नुकसानीनंतर त्यांना मोबदला मिळण्यासाठी हवामानावर आधारीत फळ पीक विमा योजना बजाज अलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीचे मॅनेजर देविदास कोळी यांच्याशी चर्चा केली. शेतकऱ्यांवर ओढवलेले संकट पाहून कुठेतरी मनाला वेदना होत होत्या, अशा नैसर्गिक संकटामुळे शेतकरी हतबल झाला आहे, त्याला खंबीर आधार देऊन उभे करावेच लागेल, अशा संकटाच्या काळात त्यांना दिलासा व मदत मिळणे गरजेची आहे, अशी भावना यावेळी चौधरी यांनी व्यक्त केली. दरम्यान, कृषी अधिकारी संभाजी ठाकूर यांच्याकडून टेलिफोनच्या माध्यमातून किती लोकांचे अर्ज आले ? केव्हा व कशी मदत करण्यात येईल ? यांची माहिती माहित अनिल चौधरी यांनी जाणून घेतली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !