भुसावळकरांचे पाण्यासाठी हाल कायम : शनिवारी पाणीपुरवठा होण्याची शक्यता
भुसावळ- शहरातील पाणीपुरवठा योजनेवरील बंद असलेल्या 500 केव्हीएच्या ट्रान्सफॉर्मरची अद्याप दुरुस्ती झाली नसल्याने शनिवारपर्यंत शहरवासीयांना टंचाईच्या झळा सोसाव्या लागणार आहेत. भर पावसाळ्यात नागरीकांना पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. शहरातील जाम मोहल्ला, खडकारोड, खाजा नगरी इमामवाडा आदी भागांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.
पाच दिवस टंचाईच्या झळा
शहरातील पाणीपुरवठा योजनेवरील जलशुद्धीकरण केंद्रातील 500 केव्हीएचा ट्रान्स्फॉर्मर मंगळवारी नादुरुस्त झाल्याने पाणीपुरवठा पुन्हा ठप्प झाला.500 अश्वशक्तीचा ट्रान्स्फॉर्मर दुरुस्त करण्यासाठी पालिकेने मंगळवारी रात्रीपासून युध्द पातळीवर दुरुस्तीचे काम सुरू केले मात्र गुरुवारपर्यंत ट्रान्सफार्मर दुरुस्त होवू न शकल्याने पालिकेने तात्पुरता भाड्याने ट्रान्सफार्मर आणण्याचे नियोजन केल्याचे पाणीपुरवठा सभापती पिंटू ठाकूर म्हणाले. शुक्रवारी ट्रान्सफार्मर बसवला गेल्यास शनिवारपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत होवू शकतो, असेही ते म्हणाले. दरम्यान, जलशुद्धीकरण केंद्रावरील ट्रान्स्फॉर्मर बिघाडाची ही दहा दिवसांतील दुसरी घटना आहे तर तब्बल तीनवेळा शहरातील पाणीपुरवठा बाधीत झाल्याने पावसाळ्याच्या काळातही पाणीपुरवठ्याचा प्रश्न सोडवण्यासाठी पालिका प्रशासनाला यश आले नसल्याने नागरीक संतप्त झाले आहेत.