माजी गृहमंत्र्यांच्या पुन्हा अडचणी वाढल्या : काटोलसह वडविहिरातील निवास्थानी ईडीची धाड
नागपूर : माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या अडचणीत सातत्याने वाढ होतच असून ईडीने अलिकडेच संपत्तीवर टाच आणली असतानाच काटोल आणि वडविहिरा येथील निवासस्थानी सक्तवसुली संचालनालय (ईडी) ने रविवारी छापेमारी केल्याने खळबळ उडाली. मनीलाँडरींग प्रकरणी नागपूर जिल्ह्याच्या काटोल आणि नरखेड तालुक्यातील वडविहिरा येथील अनिल देशमुख यांच्या वडिलोपार्जित घरात ईडीच्या अधिकार्यांची झाडाझडती सुरू केली असून ईडीच्या हाती आता नेमके काय लागते? याकडे लक्ष लागले आहे.
शंभर कोटींच्या लाच प्रकरणानंतर वाढली अडचणी
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी देशमुखांवर सचिन वाझेला 100 कोटींच्या वसुलीचे टार्गेट दिल्याचा आरोप केला होता. देशमुखांनी सचिन वाझेच्या मदतीने मुंबईतील बारचालकांकडून अवैधरीत्या चार कोटी 70 लाख रुपये वसूल केले. तसेच दिल्लीतील एका बनावट कंपनीच्या माध्यमातून अनिल देशमुख यांनी चार कोटी 18 लाख रुपये जमवले असून, ते श्री साई शिक्षण संस्था या ट्रस्टमध्ये आल्याचे भासविल्याची माहितीही ईडीकडे असल्याचे समजते. ईडीने देशमुख यांचे दोन सचिव कुंदन शिंदे आणि संजीव पालांडे यांना अटक केली असून, दोघेही ईडीच्या कोठडीत आहेत तर तळोजा कारागृहात असलेल्या सचिन वाझेचाही या प्रकरणात ईडीने जबाब नोंदवला आहे.




