जीवशिवाचे ऐक्य म्हणजे काला -हभप लक्ष्मण महाराज चिखलीकर


श्री क्षेत्र वृंदावनात श्रीमद् भागवत कथेचा समारोप

भुसावळ- लौकीक अर्थाने पोहे, दही, दूध, ताक व लोणी हे खाद्यपदार्थ एकत्र कालविणे म्हणजे काला होय. गोकुळात श्रीकृष्णाने गायी चारतांना स्वत:ची व सवंगड्यांच्या शिदोर्र्‍या एकत्र करून त्या खाद्यपदार्थांचा काला केला व सर्वांसह भक्षण केला. मात्र अलौकिक अर्थाने जीव-शिवाचे ऐक्य म्हणजे काला होय. असा काला जीवनात आनंदाची प्राप्ती करून देत असल्याचे प्रतिपादन हभप लक्ष्मण महाराज चिखलीकर यांनी वृंदावनात केले. श्री क्षेत्र वृंदावन येथील हिसा आश्रमात पार पडलेल्या श्रीमद् भागवत कथेच्या समारोपात आयोजित काल्याच्या कीर्तनात ते बोलत होते.

श्रीकृष्ण लीलांचे कथन
हेचि आता जेऊ सवे घेऊ शिदोरी या संत तुकाराम महाराज यांच्या अभंगावर चिंतन करून त्यांनी श्रीकृष्ण लीलांचे कथन केले. ते म्हणाले की, गोपाळकाला म्हणजे पांढर्‍या रंगाच्या पाच रसात्मक स्वादांचा जास्तीत जास्त प्रमाणात निर्गुण चैतन्याशी संबंध दर्शवणारा व पूर्णावतारी कृष्णकार्याचे दर्शक असलेला संचय होय. गोपाळकाला हा श्रीकृष्णाच्या विविधांगी पूर्णावतारी कार्याचे प्रतिनिधीत्व करतो. पोहे, दही, दूध, ताक व लोणी हे काल्यातील प्रमुख घटक त्या-त्या स्तरावरील भक्तीचे निदर्शक असल्याचेही त्यांनी सांगितले. भुसावळसह परीसरातून सुमारे सव्वाशे भाविक यमुना नदीच्या काठी असणार्‍या वृंदावनातील हिसा आश्रमात 2 ते 8 ऑगस्ट दरम्यान आयोजित श्रीमद् भागवत कथेसाठी गेले आहेत. कथा प्रवक्ते हभप उमेश महाराज (छोटू) साकेगावकर हे आहेत. कथेचा समारोप लक्ष्मण महाराज चिखलीकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने झाला. यावेळी भागवताचार्य कन्हैयाजी महाराज खडकोद, उमेश छोटू महाराज, ज्ञानेश्वर महाराज मेहूणकर यांच्यासह सव्वाशे भाविक उपस्थित होते.


कॉपी करू नका.