पुण्यात खळबळ : गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या संशयीतावर झाडल्या सहा गोळ्या
पुणे : गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या संशयीताच्या कारवर गोळीबार करुन त्याला जखमी करण्याचा प्रकार शिवणे येथील स्मशान भूमी ते एनडीए रोड दरम्यान रविवारी रात्री पावणेदहा वाजता घडला. या प्रकरणी केदार शहाजी भालशंकर (24, रा. रामनगर, वारजे) याच्या पाठीत गोळी लागल्याने तो जखमी झाला आहे. भालशंकर याच्या फिर्यादीवरुन उत्तमनगर पोलिसांनी निलेश गायकवाड व त्याच्या तीन ते चार साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे. केदार भालशंकर व त्याचे मित्र हर्षवर्धन मोहिते व आकाश शिंदे हे कारमधून रविवारी रात्री पावणेदहा वाजता घरी जात होते. केदार भालशंकर हा गाडी चालवत होता. त्यावेळी शिवणे स्मशान भूमी ते एनडीए रोड दरम्यान निलेश गायकवाड व त्याचे तीन ते चार साथीदार 3 दुचाकीवरुन आले. त्यांनी भालशंकर याच्या गाडीचा पाठलाग करुन त्यांच्यावर फायरिंग केले. त्यांनी एका पाठोपाठ एक अशा 6 गोळ्या झाडल्या. त्यातील एक गोळी कारच्या मागील बाजूच्या काचेतून आरपार शिरुन भालशंकर याच्या पाठीत घुसली. त्यात तो जखमी झाला.