प्रसिद्ध बांधकाम व्यावसायीक अविनाश भोसले यांची चार कोटींची संपत्ती जप्त
पुणे : पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले आणि त्यांचा मुलगा अमित ईडीच्या रडारवर असून ईडीने अविनाश भोसले इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची जागा जप्त केली आहे. बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांची चार कोटी रुपयांची संपत्ती जप्त करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. ही जमीन पुण्यातील गणेशखिंड रोडवरील रेंज हिल कॉर्नरमधील प्लॉन नंबर 2, यशवंत घाडगे नगर सहकारी गृहनिर्माण संस्थेत आहे.
यापूर्वी 40 कोटींची संपत्ती जप्त
यापूर्वी परकिय चलन गैरव्यवहार प्रकरणात बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले, तसेच त्यांच्या कुटुंबीयांची 40 कोटी 34 लाख रुपयांची मालमत्ता सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) जप्त केली होती. भोसले कुटुंबीयांची पुणे, नागपूर, गोवा परिसरात तारांकित हॉटेल्स आहेत. दुबईतील एका कंपनीत भोसले यांची गुंतवणूकही आहे. भोसले यांची ईडीकडून ‘फेमा’(फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट अॅक्ट 1999) कायद्यान्वये सप्टेंबर 2017 पासून चौकशी सुरू होती. भोसले यांची अविनाश भोसले इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. (अबिल) ही बांधकाम कंपनी आहे. या कंपनीच्या नावाने भोसले तसेच त्यांच्या कुटुंबीयांच्या बँक खात्यात एक कोटी 15 लाख रुपये एवढी रक्कम ठेवण्यात आली आहे. परकीय चलन व्यवहार प्रकरणात भोसले यांच्याकडून नियमांचे उल्लंघन करण्यात आल्याचे ईडीकडून करण्यात आलेल्या चौकशीत निष्पन्न झाल्यानंतर भोसले तसेच कुटुंबीयांच्या नावावर असलेली 40 कोटी 43 लाखांची मालमत्ता जप्त करण्यात आली होती.