आठ लाखांची लाच भोवली : नाशिकच्या माध्यमिक शिक्षणाधिकार्यांसह तिघे एसीबीच्या जाळ्यात
नाशिक : तक्रारदार यांच्या संस्थेच्या शाळांना मंजूर झालेल्या 20 टक्के अनुदानाप्रमाणे नियमित वेतन सुरू करण्याबाबतचा कार्यादेश काढून देण्यासाठी तडजोडीअंती आठ लाखांची लाच स्वीकारणार्या नाशिक जिल्हा परीषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी वैशाली पंकज वीर (44) यांच्यासह शासकीय वाहन चालक ज्ञानेश्वर सूर्यकांत येवले व जि.प. शाळा राजेवाडीचे प्राथमिक शिक्षक पंकज रमे दशपुते यांना ठाणे एसीबीच्या पथकाने लाच स्वीकारताच अटक केल्याने शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली.
तडजोडीअंती स्वीकारली आठ लाखांची लाच
45 वर्षीय तक्रारदाराने ठाणे एसीबीकडे तक्रार नोंदवली होती. आरोपी शिक्षणाधिकारी यांनी 6 जुलै व 27 जुलै रोजी लाच मागितल्याचे निष्पन्न झाल्यानंतर सापळा रचण्यात आला. मंगळवारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास चालकास जिल्हा परीषदेजवळील सिग्नलजवळ लाच स्वीकारताच अटक करण्यात आली तर या प्रकरणात मध्यस्थी करणारे शिक्षक पंकज दशपुते यांनाही अटक करण्यात आल्यानंतर वैशाली वीर यांनाही अटक करण्यात आली.
यांनी केला सापळा यशस्वी
हा सापळा पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले, पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांच्या मार्गदर्शनाखाली एसीबीच्या ठाणेच्या निरीक्षक पल्लवी ढगे.पाटील, हवालदार मोरे, लोटेकर, शिंदे , अश्विनी राजपूत, सुतार, चालक शिंदे आदींच्या पथकाने यशस्वी केला.
