‘त्या’ सीडीबाबत माजी मंत्री एकनाथराव खडसेंचे मोठे विधान !
मुक्ताईनगर : ‘त्यांनी ईडी लावली तर आम्ही सीडी लाऊ’ असे अलीकडील काळात नाथाभाऊंनी म्हटल्यानंतर त्यावरून राज्यात मोठी चर्चा झाली मात्र रविवारी माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी सीडी प्रकरणात प्रथमच भाष्य करीत आपण पोलिसांकडे ती सीडी दिली असून योग्य वेळी दाखवणार असल्याचे सूचक वक्तव्य केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
विरोधकांच्या टिकेला अखेर उत्तर
खडसे यांच्या मागे ईडी लागली असली तरी ते सीडी दाखवत नसल्याने विरोधक त्यांच्यावर टीका करत होते. यावर त्यांनी आज आपले मत मांडली आहे. ईडी लावली तर सीडी लावेन, असं मी म्हणालो होतो. हे खरं आहे. गेल्या पाच सहा महिन्यांपासून ती सीडी पोलिसांकडे दिली आहे. पोलीस त्याची चौकशी करत आहेत. चौकशी अहवाल आल्यानंतर लवकरच मी हा अहवाल जाहीर करणार आहे, असं खडसे म्हणाले.


दादांनी त्या लोकांची चौकशी निश्चित करावी
जे भ्रष्टाचार करतात, गैरव्यवहार करतात त्या लोकांवर आम्ही कारवाई करतो, असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले होते. त्यामुळे मला अपेक्षा आहे की दादांनी त्यांच्या शेजारी बसणार्या लोकांची चौकशी करावी. त्यांनी माझी ईडीची चौकशी लावली हे चंद्रकांतदादांनी मान्य केलं. त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे, असा टोलाही त्यांनी लगावला. विधानसभेत मी वारंवार विचारलं माझा दोष काय आहे ते सांगा. आता ईडीने चौकशी लावली. ती कोर्टात काय व्हायचं ते होईल, असंही त्यांनी सांगितलं.
