जिल्हा बँक निवडणूक ; जिल्हा परीषद सदस्य नंदकिशोर महाजनांविरोधात माजी आमदार अरुण पाटील पुन्हा आमने-सामने उभे राहण्याची शक्यता
रावेर : रावेर तालुक्यातून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत माजी आमदार अरुण पाटील व विद्यमान संचालक नंदकिशोर महाजन पुन्हा आमने-सामने येण्याची दाट शक्यता आहे. दोघे निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असून काँग्रेसकडून अद्याप चाचपणीच सुरू असल्याचे आमदार शिरीष चौधरी म्हणाले.
काँग्रेसकडे अद्याप उमेदवारच नाही
रावेर तालुक्यातून जिल्हा बँकेसाठी संचालकपदाची निवडणूक होणार आहे. आर्थिक सामाजिक आणि रणनीतीक बेसवर आतापर्यंत ही निवडणूक झाली आहे. अत्यंत प्रतिष्ठेची मानली जाणार्या या निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. सध्या रावेर तालुक्यातून विकासो मतदारसंघातून नंदकिशोर महाजन हे संचालक म्हणून प्रतिनिधीत्व करीत आहे तर यंदा होणार्या संचालक पदाच्या निवडणुकीसाठी माजी आमदार अरुण पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून इच्छुक असून भारतीय जनता पक्षाने संधी दिल्यास पुन्हा निवडणुकीच्या रींगणात उतरणार असल्याचे संचालक नंदकिशोर महाजन यांनी सांगितले. काँग्रेस पक्षाने स्वबळावर निवडणूक लढविण्याचा नारा दिला असला तरी अद्याप काँग्रेसकडे उमेदवारच नाही. या संदर्भात आमदार शिरीष चौधरी म्हणाले की, उमेदवारी संदर्भात सोमवारी महत्वाची बैठक घेतली जाईल. अद्याप आमच्याकडे उमेदवार नाही. बैठक घेऊन कार्यकर्ते यांच्याशी चर्चा करून उमेदवारी संदर्भात निर्णय घेतला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.



सर्वपक्षीय पॅनलमध्ये कोणाला संधी मिळणार?
माजी आमदार अरुण पाटील राष्ट्रवादीकडून इच्छुक आहे तर भाजपाकडून नंदकिशोर महाजन इच्छुक आहे. जिल्हा पातळीवर राष्ट्रवादी, भाजपा आणि शिवसेना असे तिघे पक्षाचे लोक एकत्र येऊन सर्वपक्षीय पॅनल तयार करणार असल्याने रावेर तालुक्यातून या पॅनलमध्ये कोणाला संधी मिळेल याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.
उमेदवारी संदर्भात काँग्रेसची आज बैठक
जिल्हा बँक निवडणुकीत काँग्रेस पक्षाने स्वबळाचा नारा दिला आहे त्यामुळे तालुक्यातुन जिल्हा बँकेला काँग्रेस कोणाला उमेदवारी देईल याकडे लक्ष आहे. येथून उमेदवार निवडून आणण्याची जबाबदारी काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष तथा आमदार शिरीष चौधरी यांच्या खांद्यावर असणार आहे त्यामुळे उमेदवारी संदर्भात चौधरी यांनी सोमवारी एक महत्वाची बैठक बोलावली आहे.
तालुक्यातुन 54 ठराव गेल्याची माहिती
जिल्हा बँक निवडणुकीसाठी रावेर तालुक्यात एकूण 62 विविध कार्यकारी सोसायटी आहेत. त्यापैकी 8 ठिकाणी प्रशासक असून 54 गावांचे ठराव रावेर तालुक्यातुन गेल्याची माहिती आहे. यामधून सर्वात जास्त मते घेणार्या उमेदवाराला जिल्हा बँकेत संचालक पदावर काम करण्याची संधी मिळणार आहे. अत्यंत प्रतिष्ठेची ही निवडणूक आर्थिक गणितांवर अवलंबून असल्याची चर्चा आहे.

