सावदा भाजपच्या नगराध्यक्षांसह नऊ नगरसेवकांना कारणे दाखवा नोटीस


सावदा : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आढावा बैठकीच्या कार्यक्रमातील व्यासपीठावर हजेरी लावल्यानंतर भाजपच्या लोकनियुक्त नगराध्यक्षांसह नऊ नगरसेवकांना तालुका भाजपतर्फे कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. गत महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेसची सावदा शहर आढावा बैठकीत लोकनियुक्त नगराध्यक्षा अनिता पंकज येवले यांच्यासह 9 नगरसेवकांनी उपस्थिती लावल्याने राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली होती. 2016 साली झालेल्या नगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणूक भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवत अनिता पंकज येवले व 10 जण नगरसेवक म्हणून निवडून आले होते. त्यातील एक नगरसेविका वगळता बाकी सर्व राष्ट्रवादीच्या व्यासपीठावर दिसले होते. याची भारतीय जनता पक्षाकडून गंभीर दखल घेण्यात आली असून त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. पक्षाचे जळगाव जिल्हाध्यक्ष राजूमामा भोळे यांच्या निर्देशानुसार अनिता पंकज येवले यांच्यासह नऊ नगरसेवकांना ही नोटीस बजावण्यात आली. सात दिवसांमध्ये उत्तर न दिल्यास कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा नोटीसीत नमूद करण्यात आला आहे. दरम्यान, नगराध्यक्षांसह नगरसेवक काय कारणे सांगतात व पक्ष नेमकी काय भूमिका घेतो? याकडे आता लक्ष लागले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !