सावदा नगरसेवक अजय भारंबे यांना दिलासा : अपात्रतेचा अर्ज फेटाळला


सावदा : सावदा पालिकेतील सत्ताधारी गटाचे गटनेते तथा नगरसेवक अजय भारंबे यांना अपात्र करण्याबाबत दाखल अर्ज जिल्हाधिकार्‍यांनी दोन्ही बाजूच्या सुनावणी अंती फेटाळल्याने भारंबे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. नगरसेवक अजय भारंबे यांचे वडील भागवत अवसु भारंबे यांनी त्यांच्या मालकिचा भूखंड विकसीत करताना नियम व अटीचा भंग केला. हा भाग पालिका हद्दित जोडला गेली असताना तेथील खुल्या जागेत शेती पेरणी केली तसेच येथे मूलभूत सुविधा, गटारी ह्या न करता पालिकेने त्या केल्याबाबत नगरसेवक राजेंद्र चौधरी, राजेश वानखेडे, सिद्धार्थ बडगे, फिरोज खान हबीबुल्ला खान पठाण यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे नगरसेवक अजय भारंबे यांचे पद रद्द करण्याबाबत अर्ज दाखल केला होता. भारंबे यांनी आपण वडिलांपासून विभक्त राहत असून राजकीय भावनेने आपल्याविरोधात अर्ज केल्याचे म्हणणे मांडले. हा युक्तिवाद जिल्हाधिकारी यांनी ग्राह्य धरत नगरसेवक अजय भारंबे यांच्याविरोधात दाखल अर्ज निकाली काढला.

‘त्या’ भूखंडाबाबत पालिकेचा मार्ग मोकळा
गट क्रमांक 131 मधील खुला भूखंड वापराचा व भागवत अवसु भारंबे यांच्याकडील थकबाकी वसुली बाबतची रक्कम वसुली करण्यास बाधा असणार नाही, असे आदेशही जिल्हाधिकार्‍यांना दिले आहेत. निकालानंतर सत्याचा विजय असल्याची प्रतिक्रिया नगरसेवक अजय भारंबे यांनी दिली तर नगरसेवक राजेंद्र चौधरी यांनी आम्ही पालिकेचे नुकसान होऊ नये म्हणून वसुलीबाबत जो अर्ज केला त्या वसुलीबाबत बाधा नसल्याचे जिल्हाधिकारी यांनी आदेश दिल्याने आम्ही समाधानी असल्याचे म्हटले आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !