सेवानिवृत्त शिक्षिकेच्या घरातून 61 तोळे सोन्याची चोरी
फलटण : सेवानिवृत्त शिक्षिकेच्या घरातून तब्बल 61 तोळं सोन चोरीला गेल्याने फलटण तालुक्यातील कोळकी येथे प्रचंड खळबळ उडाली आहे. ही घटना शुक्रवारी मध्यरात्री घडली. फलटण शहरानजीक कोळकी गावच्या हद्दीतील शारदानगर येथील कस्तुरा सीताराम माळी (वय 63) या सेवानिवृत्त शिक्षिका आहेत. त्यांच्या घरामध्ये त्या आणि त्यांची बहीण राहतात. दोन दिवसांपूर्वी घराला कुलूप लावून त्या बाहेरगावी गेल्या होत्या. घरात कोणी नसल्याचे पाहून शुक्रवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराच्या खिडकीचे गज वाकवून घरात प्रवेश केला. घरातील कपाटात ठेवलेले त्यांचे व त्यांची बहीण शकुंतला यांचे 61 तोळे सहा ग्रॅम वजनाचे विविध प्रकारचे सोन्याचे सर्व दागिने चोरून नेले. या दागिन्यांची किंमत तब्बल 14 लाख रुपये होती. दरम्यान, शनिवारी सकाळी त्या घरी आल्या असता त्यांच्या घरात चोरी झाल्याचे निदर्शनास आले.

