सोमय्यांनी पुन्हा डागली तोफ : हसन मुश्रीफ व परीवाराचा गडहिंग्लज सहकारी कारखान्यात 100 कोटींचा घोटाळा
सातारा : भाजप नेते तथा माजी खासदार किरीट सोमय्या यांनी पुन्हा हसन मुश्रीफ व त्यांच्या परीवारावर भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला आहे. ते म्हणाले की, गडहिंग्लजच्या आप्पासाहेब नलावडे सहकारी कारखान्यात 100 कोटींचा घोटाळा झाला असून हसन मुश्रीफ आणि आप्पासाहेब नलावडे गडहिंग्लज सहकारी साखर कारखान्याचा काय संबंध? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. मुश्रीफांचे घोटाळे जनतेसमोर मांडा, अशी सूचना आपल्याला खुद्द देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांनी दिली असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. ते कराड पोलिसांनी कोल्हापूरला जाण्यापासून रोखल्यानंतर पत्रकारांशी बोलत होते.
सोमय्या म्हणाले, तर या कंपनीचीही चौकशी करा
सोमय्या म्हणाले, हसन मुश्रीफ आणि आप्पासाहेब नलावडे गडहिंग्लज सहकारी साखर कारखान्याचा संबंध काय? हसन मुश्रीफ आणि परिवाराने आप्पासाहेब नलावडे गडहिंग्लज सहकारी कारखान्यात 100 कोटी रुपयांचा घोटाळा केला आहे. एवढेच नाही, तर 2020 मध्ये कुठल्याही पारदर्शतेशिवाय हा कारखाना ब्रिक्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेडला देण्यात आला. ब्रिक्स इंडिया कंपनी ही बेनामी कंपनी आहे. हसन मुश्रीफांचे जावई या कंपनीचे मालक आहेत. या कंपनीचीही चौकशी व्हायला हवी, अशी आमची मागणी आहे, असेही सोमय्या म्हणाले. हसन मुश्रीफ यांचा तिसरा घोटाळा मी उघडकीस आणणार आहे, असा इशाराही सोमय्या यांनी दिला आहे.



