कंडारी ग्रामपंचायत सरपंच सुवर्णा कोळी अपात्र


मालमत्ता कराची रक्कम एक दिवस उशिरा भरल्याच्या तक्रारीनंतर जिल्हाधिकार्‍यांचा निर्णय

भुसावळ : तालुक्यातील कंडारी ग्रामपंचायतीच्या सरपंच सुवर्णा नितीन कोळी यांनी ग्रामपंचायत कराची रक्कम मुदतीत भरली नाही याविषयीच्या तक्रारीनुसार जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी मंगळवार, 21 रोजी कोळी यांच्या अपात्रतेचे आदेश काढले. कंडारीच्या सरपंच सुवर्णा कोळी जानेवारी 2021 मध्ये ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आल्या होत्या. आरक्षणानंतर त्यांची सरपंचपदी वर्णी लागली होती. दरम्यान, ग्रामपंचायत सदस्य दीपक तायडे यांनी सरपंच कोळी यांनी मालमत्ता कराची रक्कम मुदतीत न भरली नाही. त्यांना अपात्र करावे अशी तक्रार केली होती. सरपंच कोळी या एकत्र कुटुंबात राहतात. घर क्रमांक 384 ही मालमत्ता त्यांचे सासरे रामराव नामदेव कोळी यांचे नावे आहे. या मालमत्तेचा थकीत कर भरणा 29 डिसेंबर 2020 पर्यंत भरणे आवश्यक होते. मात्र, त्यांनी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी 30 डिसेंबर 2020 रोजी कर भरणा केला. नामनिर्देशन पत्राच्या शेवटच्या दिवसापर्यंत त्या मालमत्ता कराच्या थकबाकीदार होत्या. सासर्‍यांच्या नावे असलेला थकीत मालमत्ता कराचा भरणा मुदतीत न झाल्याचे निर्दशनास आल्याने जिल्हाधिकार्‍यांनी कोळी यांना अपात्र घोषित केले.

आदेश मिळाल्यावर आयुक्तांकडे अपील करणार
अपात्रतेचे आदेश अद्याप आम्हाला प्राप्त झालेले नाहीत. ते प्राप्त झाल्यानंतर नाशिक महसूल आयुक्तांकडे अपील करण्यात येईल. तेथे न्याय मिळावा, असे आमचे प्रयत्न असतील, असे सुवर्णा कोळी यांनी सांगितले.

मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !