रेल्वेच्या धक्क्याने सिंधी कॉलनीतील प्रौढाचा मृत्यू
जळगाव : रेल्वेच्या धक्क्याने सिंधी कॉलनीतील 42 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सकाळी 8.30 वाजेच्यापुर्वी जळगाव खूर्द रेल्वे फाट्याजवळ घडली. सुरेश दौलतराम खत्री (42, रा. सिंधी कॉलनी, जळगाव) असे मयत प्रौढाचे नाव आहे. नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरेश खत्री हे सिंधी कॉलनीत पत्नी व दोन मुलांसह वास्तव्याला होते. गेल्या काही दिवसांपासून ते मानसिक तणावात असल्याने भुसावळ रोडवरील खासगी रूग्णालयात 21 सप्टेंबर रोजी उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. दरम्यान हॉस्पीटलजवळून काही अंतरावर असलेल्या जळगाव खूर्द रेल्वे फाट्याजवळ आज बुधवार, 29 सप्टेंबर रोजी सकाळी 8.30 वाजेच्या पुर्वी त्यांचा धावत्या रेल्वेचा धक्का लागल्याने जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. त्यांचा मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणण्यात आला. त्यांच्या पश्चात पत्नी कोमल, मोहित आणि मयूर ही लहान दोन मुले असा परीवार आहे.








