भुसावळात दारूसाठी पैसे न दिल्याने युवकास मारहाण : चौघांविरोधात गुन्हा


भुसावळ : शहरातील आठवडे बाजारात भाजीपाला घेण्यासाठी गेलेल्या तरुणाकडे दोघांनी दारू पिण्यासाठी पैसे मागितले मात्र नकार दिल्याने चाकूच्या धाकावर तरुणाला दुचाकीवरून नेब कॉलनीमधील महाकाल प्रतिष्ठान मंडळाच्या पाठीमागे नेऊन जबर मारहाण करण्यात आली. याप्रकरणी चौघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. जखमीवर दवाखान्यात उपचार सुरू आहे. ही घटना शनिवार, 16 ऑक्टोबरला दुपारी 12 वाजता घडली.

चौघांविरोधात पोलिसात गुन्हा
गोविंद कॉलनीतील रहिवासी सुशांत अनिल पाटील हा शनिवार, 16 ऑक्टोबरला दुपारी 12 वाजता बाजारात भाजीपाला खरेदीसाठी गेला. तेथे कल्पना रसवंती मागे अमोल भागवत राणे उर्फ शेवभाजी (रा.गोविंद कॉलनी, भुसावळ) याने आवाज देत थांबवले. दारू पिण्यासाठी 50 रुपयांची मागणी केली. त्यास नकार दिल्याने अमोलने खिशातून चाकू काढून सुशांतला बळजबरीने त्याच्या दुचाकीवर बसवले तर सुशांतची दुचाकी (एमएच. 19.बीसी.7166) मंगेश काळे याने घेतली. यानंतर सुशांतला नेब कॉलनीत नेत अमोल राणे, मंगेश काळे, अविनाश दीपक पाटील उर्फ अवि (रा. गोविंद कॉलनी) व अक्षय जराडे यांनी मारहाण केली. काही परीचितांनी सुशांतला रीक्षातून दवाखान्यात नेले. त्याच्यावर डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालात उपचार सुरू आहे. याप्रकरणी अमोल राणे, मंगेश काळे, अविनाश पाटील, अक्षय जराडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. तपास प्रभारी पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !