सावदा स्वामीनारायण मंदिरात गोवर्धन पूजनासह अन्नकूट महोत्सव भक्तिभावात

भगवंताला विविध खाद्यपदार्थांचा नैवेद्य अर्पण ; संत-महंतांच्या सान्निध्यात धार्मिक सोहळा उत्साहात


सावदा (सोमवार, 9 नोव्हेंबर 2026) : दीपावली पाडव्याच्या मंगलमय पर्वाचे औचित्य साधून श्री वडतालधाम अंतर्गत सावदा येथील श्री स्वामीनारायण मंदिरात गोवर्धन पूजन व अन्नकूट महोत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. विविध धार्मिक विधी, पूजन, आरती आणि संतांच्या आशीर्वचनांनी मंदिर परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. या सोहळ्याला भाविकांची उपस्थिती लाभली.

गोवर्धन पूजनाने महोत्सवाला सुरूवात
महोत्सवाचा प्रारंभ सकाळी पारंपरिक पद्धतीने गोवर्धन पूजनाने करण्यात आला. कलाशिक्षक नंदकुमार पाटील व पूनम पाटील यांच्या हस्ते गोवर्धनाचे विधीवत पूजन करण्यात आले. त्यानंतर हरिकृष्ण महाराज व राधाकृष्ण देव यांची मंगलमय आरती सद्गुरू शास्त्री स्वामी भक्तीप्रकाशदासजी (अध्यक्ष, श्री स्वामीनारायण गुरुकुल, सावदा) यांच्याहस्ते झाली.









भगवंताप्रती श्रद्धा, भक्तिभाव, समर्पण व्यक्त करण्याचा उत्सव
यानंतर आयोजित आशीर्वचन सभेत सद्गुरू शास्त्री स्वामी भक्तीप्रकाशदासजी यांनी गोवर्धन पूजन व अन्नकूट महोत्सवामागील धार्मिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक महत्त्व विषद केले. भगवान श्रीकृष्णांनी गोवर्धन पूजनाच्या माध्यमातून मानवाला निसर्ग, गोमाता आणि सृष्टीतील प्रत्येक घटकाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा संदेश दिला आहे. अन्नकूट महोत्सव हा भगवंताप्रती श्रद्धा, भक्तिभाव आणि समर्पण व्यक्त करण्याचा उत्सव असून, अन्न हे ईश्वराचे प्रसादस्वरूप वरदान आहे, याची जाणीव या उत्सवातून होते, असे त्यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले.

नैवेद्य अर्पण
आशीर्वचन सभेनंतर भगवंताला विविध प्रकारच्या खाद्यपदार्थांचा आकर्षक व भव्य नैवेद्य अर्पण करण्यात आला. विविध पक्वान्नांनी सजविण्यात आलेल्या अन्नकूटाची विधिवत आरती करण्यात आली. यावेळी उपस्थित भाविकांनी भक्तिभावाने दर्शन घेतले. संपूर्ण मंदिर परिसरात जयघोष, भक्तिगीते आणि धार्मिक वातावरणामुळे उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

यांचे विशेष परिश्रम
यशस्वी आयोजनासाठी मंदिराचे कोठारी शास्त्री स्वामी स्वयंप्रकाशदासजी, शास्त्री स्वामी विश्वप्रकाशदासजी, शास्त्री स्वामी भक्तीप्रियदासजी, श्रीजीप्रियदासजी, भंडारी स्वामी माधवप्रियदासजी, मंदिराचे पुजारी सत्यप्रकाशदासजी यांच्यासह युवक मंडळ व युवक भक्तांनी विशेष परिश्रम घेतले. संत-महंतांचे मार्गदर्शन, सेवेकर्‍यांचे योगदान आणि युवक मंडळाच्या नियोजनबद्ध सहकार्यामुळे गोवर्धन पूजन व अन्नकूट महोत्सव भक्तिमय वातावरणात उत्साहात आणि मंगलमयरीत्या झाला.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !