येवतीत विवाहितेची आत्महत्या : पतीसह चौघांविरुद्ध गुन्हा
बोदवड : तालुक्यातील येवती येथे 7 ऑक्टोबर रोजी विवाहिता सुलताना बी.शेख युनूस पठाण (25) यांनी गळफास घेवून आत्महत्या केली होती. विवाहितेने आत्महत्या का केली? याचे कारण त्यावेळी गुलदस्त्यात होते मात्र बुधवारी मयताचे वडीलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मुलीला घरकाम येत नाही शिवाय घर बांधणीसाठी दोन लाख रुपये न आणल्याने तिचा छळ सुरू असल्याने कंटाळून तिने आत्महत्या केल्याची तक्रार देण्यात आल्याने पतीसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
पतीसह चौघांविरुद्ध गुन्हा
मयत विवाहितेचे वडील शेख नजीर शेख सत्तार (40, हिदायत नगर, बोदवड) यांच्या फिर्यादीनुसार 2016 ते 7 ऑक्टोंबर 2019 दरम्यान विवाहितेच्या सासरी आरोपींनी घर बांधण्यासाठी माहेरून दोन लाख रुपये आणावेत म्हणून छळ चालवला होता शिवाय पैसे न आणल्यास घरातून बाहेर काढून टाकू व घरात व्यवस्थित काम करीत नाही या कारणावरून छळ चालवल्याचा आरोप करण्यात आला. छळ असह्य झाल्यानेच मुलीने आत्महत्या केल्याचे तक्रारीत नमूद आहे. या प्रकरणी संशयीत आरोपी तथा पती युनूस खा युसूफ खा पठाण, सासरे युसूफ खा खजेखा पठाण सासरा, सासू साहेनजबी युसूफ खा पठाण तसेच शाहरुख युसूफ खा पठाण यांच्याविरुद्ध बोदवड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस निरीक्षक सुनील खरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.



