अल्पवयीन बालकेही नैराश्याच्या जाळ्यात
सायकॉलॉजीकल काउंसलर निलेश गोरे : बदलत्या जीवनशैलीमुळे मानसिक आजारात वाढ
भुसावळ : जागतिक मानसिक आरोग्यदिनानिमित्त मानसिक आरोग्य या विषयावर गुरुवारी सकाळी 10 वाजता संवादाचे आयोजन वेलनेस फाउंडेशन तर्फे केले होते. यावेळी शहारातील हिप्नॉथेरपीस्ट आणि सायकॉलॉजीकल काउंसलर निलेश गोरे यांनी मार्गदर्शन केले. मानसिक आजाराबाबत सखोल माहितीदेत विविध शंकांचे, गैरसमजुतीचे व प्रश्नांचे निरसन केले. मनाची सोपी व्याख्या म्हणजे विचार भावना आणि वर्तन जे जेव्हा समभूज असतात, समोतल असतात, तेव्हा त्याला आरोग्य म्हणायचे. खेचाखेच चालू असली की, त्याला म्हणायचे विसंवाद आणि त्रिकोण फाटला की त्याला म्हणायचे विकार. गेल्या काही वर्षांत बदलती जीवनशैली तसेच स्पर्धेमुळे ताणतणाव वाढले आहेत. अगदी पाळण्यातील बाळापासून वयोवृद्धांपर्यंत, चार भितीत वावरणार्या गृहिणीपासून ते कॉपरेरेट क्षेत्रात काम करणार्यांपर्यंत तणावाची पाळेमुळे खोल रुतल्याने दिवसागणिक मानसिक रुग्णांची संख्या वाढत आहे. भेदाभेद, कामाचा तणाव, स्पर्धात्मक युग, शिफ्ट वर्किंग अशा एक ना अनेक कारणांनी कार्यालयीन ठिकाणी मानसिक स्वास्थ्य बिघडते. शिवाय, याचा परिणाम कुटुंबावर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे मानसिक स्वास्थ्य जपणे गरजेचे आहे.
मानसिक आरोग्याकडे सर्वांचे दुर्लक्ष
धावपळी, भीती व अज्ञानामुळे आज मानसिक आरोग्याकडे मात्र सर्वांचेच दुर्लक्ष होत असते. विसंगती अशी आहे की, अतीशय तणावपूर्ण असे जीवन जगत असतानाच आणि जीवनातले तणाव वाढत असतानाच आपण मात्र त्यातून निर्माण होणार्या मानसिक विकृतींकडे तेवढ्याच अधिक प्रमाणात दुर्लक्ष करायला लागलो आहोत. मानसिक आजारांच्या अज्ञानापोटी समुपदेशन, थेरपीज किंवा उपचार टाळल्या जातात. परिणामी मानसिक आजारही बळावतो आणि शारीरिक आजार तर बळावतातच.

लहान मुलेही नैराश्याच्या जाळ्यात
मुलांमध्ये नैराश्य, अति चंचलता यासारखी लक्षणे आढळत आहेत. जगभरामध्ये लहान मुलांच्या मानसिक आरोग्याचे प्रश्न वाढत आहेत आणि त्याचे भारतातील प्रमाणदेखील प्रचंड आहे. अभ्यास आणि अभ्यासेतर गोष्टींमध्ये मुलांना पूर्णवेळ जखडून टाकणे, मोबाइल, इंटरनेट, गेम्स यांसारख्या गोष्टींचा अतिरेकी वापर मुलांकडून होताना कानाडोळा करणे किंवा प्रोत्साहन देणे या गोष्टी याला प्रामुख्याने कारणीभूत आहेत. पालकांनी मुलांना सकारात्मक शिस्त लावणे आवश्यक आहे. प्रत्यक्षात शाळा, शिक्षक आणि इतर घटकांनी शिस्त लावावी असा पालकांचा कल दिसतो. तो पूर्णत अयोग्य आहे.
गुन्हा केला तरी शिक्षा नसल्यची मानसिकता
बदललेल्या जीवनशैलीपासून ते चुकीच्या संगतीपर्यंत त्याची विविध कारणे या वास्तवामागे आहेत. गुन्हा केला तरी शिक्षा होत नाही, अशी मानसिकताच सर्वत्र झाली असल्याचे निलेश गोरे म्हणाले. गुन्हेगारी वाढण्यास अन्य बरीच कारणे आहेत. बदललेली जीवनशैली, युवा पिढीमध्ये निर्माण झालेली बाधक-मारक आकर्षणे, बेकारी, बदलती सामाजिक परिस्थिती, राजकीय लाभासाठी गुन्हेगारांना अभय देण्याची राजकारण्यांची प्रवृत्ती, द्रव्य लालसा, झटपट श्रीमंतीसाठीचा हव्यास, वाढती गरीब-श्रीमंतीमधली दरी आणि सर्वांत महत्त्वाचे कारण म्हणजे संस्कारांचा अभाव! गुन्हेगारी प्रवृत्ती निर्माण होणार नाही यासाठी बालपणापासून अत्यावश्यक असलेले संस्कार पालकांकडून आज होत नाहीत. शालेय शिक्षण काळात शिक्षकवर्ग पिढी घटवण्यात कमी पडतो, तर महाविद्यालयीन मुक्त जीवन काळात विद्यार्थ्यांवर कोणी लगाम घालू शकत नाही अशी एकूण सामाजिक परिस्थिती आहे ती बदलण्यासाठी प्रयत्न करणे ही सर्वांचीच जबाबदारी आहे. गुन्हेगारी वाढू नये म्हणून शासन व पोलीस यंत्रणा सक्षम हवी तसेच गुन्हेगारीची बिजे पेरली जाणार नाही म्हणून प्रभावी संस्कार करणारे पालक, शिक्षक, सामाजिक अन्य घटक कार्यक्षम असणे हे त्याहूनही अधिक गरजेचे आहे. याची जाणीव होऊन सामाजिक जागृती झाली तर गुन्हेगारीचे प्रमाण घटू शकेल ! मानसिक आजार, वाढती बाल गुन्हेगारी व इतर बाबींवर समाधानकारक माहिती दिली व मानसिक आरोग्यदिनाचे औचित्य साधून मानसिक आरोग्याबाबत माहिती देण्याचा हा एक छोटा प्रयत्न आहे असं निलेश गोरे यांनी याठिकाणी मत व्यक्त केलं. या प्रसंगी विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते.
निलेश गोरे,
हिप्नॉथेरपीस्ट आणि सायकॉलॉजीकल काउंसलर, वेलनेस फाऊंडेशन, नवशक्ति आर्केड, जामनेर रोड, भुसावळ मो.9922851678


