भुसावळात ‘जीवनवाहिनीची’ चाके थांबली : कर्मचारी आजपासून संपावर
भुसावळ : अन्यायकारक धोरणामुळे राज्य परीवहन कामगारांच्या आत्महत्येत वाढ झाल्याने शासनाचा निषेध म्हणून रविवार, 7 नोव्हेंबरच्या मध्यरात्री 12 वाजेपासून एस.टी.कर्मचारी संपावर उतरले आहेत. त्या संदर्भातील निवेदन रविवारी सकाळी कामगारांनी आगारप्रमुखांना देण्यात आले आहे. भुसावळ आगारातील सुमारे 288 कर्मचारी संपात सहभागी झाले असून बससेवा ठप्प झाल्याने शहर व ग्रामीण भागातील प्रवाशांचे चांगलेच हाल झाले तर दुसरीकडे खाजगी वाहतूकदारांची मात्र चांगलीच चांदी झाली.
महामंडळ विलिनीकरणाची मागणी
महाराष्ट्र राज्य परीवहन महामंडळ व सर्व कर्मचार्यांना राज्य शासनात विलिनीकरण करण्याची मागणी कर्मचार्यांनी केली आहे. राज्य परीवहन महामंडळ व कर्मचार्यांना शासकीय सेवेत विलिनीकरण होण्याची मागणी पूर्णत्वास नेण्यासांठी बेमुदत संप पुकारण्यात येत आहे. संपात कोणत्यांही संघटनेचा संबंध नसून एक कर्मचारी म्हणून आम्ही सर्व कर्मचारी संपात सहभागी होत आहोत, या आशयाचे निवेदन यावेळी आगारप्रमुख पी.बी.चौधरी यांना कर्मचार्यांनी आगारात रविवारी दिले. यावेळी कर्मचार्यांनी आगार प्रमुख चौधरी यांच्याशी चर्चा करून त्यांच्या मागण्या त्यांच्यासमोर मांडल्यात. सोमवारी कर्मचार्यांनी बसस्थानकात एकत्र येत घोषणाबाजी केली. एस.टी.सेवा ठप्प झाल्याने प्रवाशांना खाजगी वाहतुकीचा आधार घ्यावा लागला.



