वादळी वार्यामुळे केळीचे नुकसान : हेक्टरी 50 हजारांप्रमाणे भरपाईची मागणी
रावेर पंचायत समिती उपसभापती धनश्री सावळे यांचे कृषी अधीक्षकांना निवेदन
रावेर : तालुक्यातील खानापूर मंडळ व इतर मंडळातील वादळामुळे केळी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. शासन निर्णयाप्रमाणे शेतकर्यांचे शंभर टक्के नुकसान झाले आहे. शेतकर्यांना 50 हजार रुपये प्रमाणे हेक्टरी केळी पिकाची नुकसान भरपाईची रक्कम मिळावी, अशी मागणी पंचायत समितीच्या उपसभापती धनश्री सावळे यांनी कृषी अधीक्षक यांना केली आहे . 2 जून 2021 रोजी मोठ्या प्रमाणावर वादळी वार्यामुळे केळी पिकांचे मोठे नुकसान झाले. वार्याच्या वेगानुसार शासन निर्णयाप्रमाणे 100 टक्के नुकसान झाले असून तालुक्यातील खानापूर मंडळातील अहिरवाडी, केर्हाळे मोहगण, पिंप्री, अभोडा, जुनोने, रसलपूर, रमजीपूर, मुंजलवाडी, जीन्सी, पाल, अजनाड, अटवाडा, नेहता, दोधे, खिरवड, पातोंडी, निरुळ, पाडला या भागात केळी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. शेतकर्यांना मदत न मिळाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा संदीप सावळे, प्रमोद धनगर, गोकुळ चौधरी, प्रवीण महाजन , डिगंबर राजपूत आदींनी निवेदनाद्वारे दिला आहे.
