वरणगावकरांच्या सेवेत अग्निशमन बंब दाखल
वरणगाव : शहरात अग्निशमन दलाचा बंब नसल्याने अनेकदा अप्रिय घटना घडल्यानंतर जिल्ह्यावरून बंब मागवावा लागत होता त्यामुळे मोठे नुकसान नागरीकांसह व्यापार्यांना सोसावे लागत होते. वरणगाव पालिकेचा स्वतःचा बंब असावा, अशी मागणी जुनी असल्याने त्याबाबत सातत्याने पाठपुरावा करण्यात आल्यानंतर वरणगावकरांच्या सेवेत अग्निशमन बंब दाखल झाल्याने समाधान व्यक्त होत आहे.
यांचा पाठपुरावा ठरला मोलाचा
2019 मध्ये जिल्हा नियोजन व विकास योजनेतून अग्निशमन सेवा बळकटीरण योजनेंतर्गत 56 लाख रुपये वरणगाव शहरासाठी अग्निशमन बंबासाठी मंजूर झाले होते. तत्कालीन पालकमंत्री गिरीश महाजन, माजी मंत्री संजय सावकारे, खासदार रक्षा खडसे, तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे, जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत राऊत, तत्कालीन मुख्याधिकारी शाम गोसावी, मुख्याधिकारी समीर शेख, गुट्टे, गणेश चाटे यांच्या प्रयत्नांना यश आल्यानंतर बंब पालिकेत दाखल झाला आहे.
यांची होती उपस्थिती
पालिकेत बंब आल्यानंतर माजी नगराध्यक्ष सुनील काळे, उपनगराध्यक्ष शेख अखलाक शेख युसूफ, कामगार नेते मिलिंद मेढे, मिलिंद भैसे, हितेश चौधरी यांची उपस्थिती होती.


