मुक्ताईनगर तालुक्यात खुनातील आरोपींची पोलिसांनी काढली धिंड !

मुक्ताईनगर निरीक्षक राहुल खताळ म्हणाले : ‘कायद्यात रहाल तर फायद्यात रहाल’


मुक्ताईनगर : शहरासह तालुक्यात गेल्या काही दिवसात गुन्हेगारीने डोके वर काढल्यानंतर व्यापारी वर्गासह नागरीकांमध्ये भीती पसरली आहे. गुन्हेगारीवर पोलीस दलाने अंकुश निर्माण करावा, अशी मागणी सातत्याने केली जात होती. त्यातच कोल्हापूर जिल्ह्यातील माजी सैनिकाचा खून करण्यात आल्याची घटना हलखेडा जंगलात घडल्याने पोलीस दलावरही टिकेची झोड उठली होती. या गुन्ह्यातील पाच संशयीतांनी पोलिसांनी शिताफीने अटक केल्यानंतर त्यातील काही संशयीतांना कुर्‍हा परीसरात पोलिसांनी जनतेपुढे आणत त्यांना ‘लाठीचा’ प्रसाद देत कायद्याने धडा शिकवण्यात आला. नागरीकांच्या मनातील भीती यावेळी दूर करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

आरोपींच्या धिंडने उडाली खळबळ
कोल्हापूर जिल्ह्यातील सेवानिवृत्त माजी सैनिक प्रल्हाद शिवराम पाटील (52, सावर्डे बु.॥, ता.कागल, जि.कोल्हापूर) व अनिल आनंदा निकम (41) हे 5 रोजी शेगाव दर्शनासाठी निघाल्यानंतर त्यांचे अपहरण करीत जंगलात बेदम मारहाण करण्यात आली होती. आरोपींच्या मारहाणीत माजी सैनिक प्रल्हाद पाटील यांचा मृत्यू ओढवला होता. आरोपींनी येथेच न थांबता मृत पाटील यांच्यासह निकम यांना पुलावरू फेकून देत पोलिसात गेल्यास जीवे ठार मारण्याची धमकी दिली होती. या प्रकारामुळे नागरीकांमध्ये भीती पसरली होती. ही भीती दूर करण्यासाठी पोलिसांनी खुनातील आरोपींना थेट जनतेपुढे आणत त्यांना कायद्याने धडा शिकवला.

निरीक्षक म्हणाले : कायदा सर्वश्रेष्ठ
पोलीस निरीक्षक राहुल खताळ म्हणाले की, कायद्याचे पालन सर्वांनीच करणे गरजेचे आहे. यापुढे कायदा हातात घेणार्‍यांची पोलीस प्रशासन गय करणार नाही. नागरीकांनी सतर्क रहावे व पोलीस दलाकडून गुन्हेगारीचा निश्‍चितच बीमोड करण्यात येत असल्याचे ते यावेळी म्हणाले. यावेळी एएसआय निकम, पोलीस अंमलदार लाठे, पोलीस कॉन्स्टेबल सागर सावे, पोलीस कॉन्स्टेबल नावकर व कुर्‍हा पोलीस स्टेशनला कार्यरत असणारे सर्व पोलिस कर्मचारी उपस्थित होते.

टोळ्यांचाही व्हावा बंदोबस्त
गुप्त धन मिळण्यासाठी काळी हळदख मर्क्युरी, दुतोंडी मांडूळ साप आदी वस्तू विक्रीच्या करणार्‍या टोळ्या तालुक्यात गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत आहेत. मुंबईसह पुणे व राज्यातील अनेक भागातील सावज सोशल मिडीयाद्वारे हेरून त्यांना जंगलात बोलवायचे व मारहाण करून लुटायचे हा या टोळ्यांचा गोरखधंदा आहे. सोशल मिडीयावर चालणार्‍या या नेटवर्कचा पोलिसांनी उलगडा करून या टोळ्यांचाही कायमस्वरूपी बंदोबस्त करावा, अशी अपेक्षा या निमित्ताने आता व्यक्त होत आहे.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !