अग्निशमन बंबाबाबत वरणगाव माजी नगराध्यक्ष सुनील काळेंचा दावा खोटा

महाविकास आघाडीच्या काळातच पार पडली प्रक्रिया : जिल्हाप्रमुख समाधान महाजन


वरणगाव : वरणगाव नगरपालिकेला प्राप्त झालेल्या अग्निशमन बंब संदर्भात माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांनी केलेल्या सर्व वल्गना खोट्या असल्याचा दावा शिवसेना जिल्हाप्रमुख समाधान महाजन यांनी पत्रकार परीषदेत केला. ते म्हणाले की, वरणगाव येथील नगरपरीषदेत रविवार, 15 नोव्हेंबर रोजी जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री तथा शिवसेना उपनेते गुलाबराव पाटील यांच्याहस्ते अग्निशमन बंबाचे उद्घाटन करून तो नगरपरीषदेच्या ताब्यात देण्यात आला. त्यानंतर वरणगावचे माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांनी माध्यमातंना जी माहिती दिली ती खोटी असल्याचा दावा महाजन यांनी केला आहे.

ही बातमी अत्यंत महत्वाची- दुसर्‍याचे बाळ कड्यावर घेवून बारसे करणे ही शिवसेना जिल्हाप्रमुख महाजनांना सवय

तत्कालीन नगराध्यक्षांनी केली मागणी
महाजन म्हणाले की, अग्निशमन बंबाची मागणी 18 जानेवारी 2015 रोजी तत्कालीन नगराध्यक्षा अरुणा इंगळे यांच्या अध्यक्षतेतेखाली झालेल्या सर्वसाधारण सभेत करण्यात आली. भारतीय जनता पार्टीचे सरकार असताना या ठरावावर कुठलीच कार्यवाही झाली नाही. त्यानंतर गुलाबराव पाटील पालकमंत्री झाल्यानंतर 26 मार्च 2020 रोजी जळगाव जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार या कामास प्रशासकीय मंजुरी देण्यात आली. 2 डिसेंबर 2020 रोजी नगरपरीषदेने निवेदेसाठी नोटीस प्रसिद्ध केली. निविदा प्रसिद्धीनंतर तिला मंजुरी मिळाली व पुढील प्रक्रियेत करारनामा 14 जानेवारी 2021 रोजी करण्यात आला व तयानंतर 15 जानेवारी 2021 रोजी सदर कामाची निविदा देण्यात आली. सदरचा संपूर्ण कालावधी हा प्रशासकीय मान्यतेपासून ते अग्निशमन बंब लोकार्पण करण्यापर्यंतची प्रक्रिया ही महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळातच झाली. त्यासाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जनतेचे हित लक्षात घेता निधी उपलब्ध करून दिल्यानंतर बंब नगरपरीषदेच्या ताब्यात देण्यात आला. याबाबाबत माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांनी प्रसारमाध्यमांना दिलेली माहिती साफ खोटी व चुकीची असून दिशाभूल करणारी आहे, असेही महाजन म्हणाले.

काळेंना श्रेय घेण्याची सवयच
महाजन म्हणाले की, वरणगावकरांनी सत्यता पडताळून पहावी व संपूर्ण प्रक्रियाही वरणगाव नगरपरीषदेत प्रशासकीय काळात झालेली आहे. या प्रक्रियेत माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांचा कुठेच संबंध नाही. अशाच बाबतीत पंचवीस कोटी रुपयांच्या पाणी योजनेलादेखील पालकमंत्री गुलाबराव पाटील साहेब यांनी निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यावेळीदेखील सुनील काळे यांनी राज्यपाल महोदय व इतर नेत्यांची नावे घेऊन खोटे निवेदन केले होते. ही त्यांची नेहमीची सवय आहे, वरणगावकर जनता सुशिक्षीत व जाणकार आहे. सत्य जनतेसमोर यावे म्हणून हे प्रसिद्धी पत्रक आम्ही देत असल्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख समाधान महाजन म्हणाले. प्रसंगी उपजिल्हा संघटक विलास मुळे, उपतालुकाप्रमुख सुभाष चौधरी, उपजिल्हा संघटक सईद मुल्लाजी, पंचायत समिती सदस्य विजय सुरवाडे, मुस्लिम समाजाचे नेते सय्यद जाफर अली उर्फ हिप्पी सेट, निलेश ठाकूर, सागर वंजारी, आझाद शेख, भूषण बाविस्कर उपस्थित होते.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !