चाळीसगाव तालुक्यातील भाविकांना पर्वणी : कार्तिक स्वामींचे मंदिर आज व उद्या दर्शनार्थ खुले राहणार
चाळीसगाव : कार्तिक स्वामी दर्शन सोहळा गुरुवार, 18 नोव्हेंबर रोजी रात्री 1 वाजेपासून शुक्रवार, 19 नोव्हेंबर 2021 पर्यंत दुपारी 2 वाजून 26 मिनिटेपर्यंत असून सिद्धेश्वर आश्रम बेलदारवाडी, गणपुर, ता.चाळीसगाव येथील कार्तिकेय मंदिर या काळात दर्शनासाठी उघडे राहणार आहे. कार्तिक स्वामींचे दर्शन स्रियांना केवळ कार्तिक पौर्णिमेला कृतिका नक्षत्रातच घेता येणार असून माता-भगिनींनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. एरव्ही कार्तिक स्वामी मंदिराला नेहमी पडदा लावलेला असतो व पुरुषच नेहमी दर्शन घेऊ शकतात मात्र या शुभ मुहूर्तावर स्त्रीयांनी दर्शन घेतल्यास त्यांना अक्षय सौभाग्य प्राप्त होते व सर्व मनोकामना पूर्ण होतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे.
जागृत देवस्थान : मनोकामना होता पूर्ण
चाळीसगाव परीसरातील हे एकमेव व जागृत देवस्थान आहे. अनेक वर्षांपासून सदर मंदिरात मोठी यात्रा भरते. जळगाव, धुळे, नाशिक, औरंगाबाद जिल्ह्यातील तसेच गुजरात मध्यप्रदेश या राज्यातूनही भाविक येत असतात. याच ठिकाणी हभप गुरुवर्य ज्ञानेश्वर माऊली यांनी नर्मदा गो शाळा सुरू केली आहे. परीसरातील सर्वांनी दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन माउलींनी केले आहे.

